Oct 13, 2016

सासर माहेर

लेखक चंद्रशेखर गोखलेंची एक गोष्ट वाचनात आली. एका तालेवार घराण्यातील लाडात वाढलेल्या लेकीचे - 'मेघनाचे' लग्न झाले. टुमदार आणि सधन अशा माहेरी जन्माला आलेल्या मेघनाचे सासर मात्र त्या मानाने मध्यमवर्गीय, सर्वसामान्य आर्थिक स्थितीतील होते. लग्नानंतर काही वर्षे उलटतात. दरम्यान माहेरी तिच्या भावांची खुप प्रगती होते, श्रीमंती ओसंडून वहाते. जुन्या चिरेबंदी वाड्याच्या जागी आधुनिक टुमदार बंगला येतो. बंगल्याच्या आवारातच दोन्ही भावांची ऑफिसेस समाविष्ट होतात.   बंगल्यातही आईवडिल, भाऊ, त्यांची मुले प्रत्येकाला स्वतंत्र रुम्स त्यांच्या आवडीनुसार तयार केल्या जातात.  वास्तुशांतीला जेव्हा मेघना माहेरी येते तेव्हा हे सगळे वैभव पाहुन खुप आनंदून जाते. मग सहजपणे भावाला विचारते की "अरे दादा,  माझी रुम कुठे आहे? " त्यावर दादा म्हणतो की अगं तुझ्यासाठी कशाला हवी स्पेशल रूम?   'गेस्ट रूम' आहे,  'स्टडी रूम' आहे,  तिथे रहा की! तसेही तु कुठे रोज असतेस इथे!" इथपर्यंतच ही गोष्ट वाचताना घशात काहीतरी अडकल्या सारखे वाटून, मनात कालवाकालव होते की नाही! बर्‍याच घरात जवळपास हीच परिस्थिती असते. लग्नानंतर मुली मनात सासर माहेर दोन्ही मनात जपतात. वेळोवेळी, प्रसंगा दाखल माहेरचे कौतुक करत असतात, प्रशंसा करतात, तुलना करत असतात. परंतु माहेरचे लोक मात्र लेक आता परकी झाली, दुसर्‍याची झाली हे गृहीत धरूनच आयुष्य जगायला लागतात. खरं तर आताच्या काळात मुलीची घरातील जागा कायम अबाधित असते हा विचार घराघरात रुजायला हवा. असो. निदान आपण तरी आपले विचार आता पासूनच ठाम करूया. घर लहान असो वा मोठे, आपल्या लेकीबाळींना कायम त्यांची हक्काची आणि मायेची जागा ठेवूया. - प्रज्ञा Https://majheviewsanireviews.blogspot.in

No comments:

Post a Comment