Dec 7, 2015

published in today's newspaper

दूरदर्शन च्या सुरवातीच्या काळात लहान मुलांसाठी मराठीत किलबील, गुजराथीत संताकुकडी, हिंदीत खेल खिलौने हा तर मॅजिक लॅम्प हा इंग्लिशमधुन कार्यक्रम असे. त्या शिवाय 'फन टाईम', 'विक्रम वेताळ', 'एक दोन तीन चार' या सारख्या खास बाल प्रेक्षकांसाठीच्या मालिका देखील कमालीच्या लोकप्रिय झाल्या होत्या. परंतु टिव्हीवर आज अहोरात्र सुरू असणारे असंख्य चॅनल्स असूनही लहान मुलांचे कार्यक्रम कोणत्याही वाहिनीवर सुरू नाहीत. बालविश्वावरील कार्यक्रम सुरू झाले तर प्रेक्षक त्यात्याही उपक्रमास चांगला टीआरपी मिळवून देतील यात शंका नाही.

Dec 6, 2015

होणार सुन मी.......!

होणार सुन मी या घरची' या मालिकेत दाखवण्यात आलेल्या बँकेचा कृपया आम्हाला पत्ता देण्यात यावा जिथे बँके कर्मचारी कार्यालयीन वेळेत कितीही वेळ घरगुती चर्चा करू शकतात. अगदी नातेवाईकापासुन ते नवीन चादरी, पडदे इत्यादींच्या खरेदी पर्यंत! भारतातील अशी कोणती बँके आहे जी अगदी सामसूम आहे आणि अगदी तुरळक कस्टमर्स आहेत आणि जिथे नातेवाईक कधीही येऊन भेटु शकतात. कामाची घाईगडबड तर अजिबात नाही. आज कोणत्याही बँक किंवा इतर ऑफिस मध्ये अशी परिस्थिती आढळून येत नाही. कृपया, संबंधित अधिकारी व चॅनेल नी या गोष्टींचा विचार करावा आणि अतार्किक व अवास्तव गोष्टी दाखवणे बंद कराव्यात.

Dec 4, 2015

#बायgoबाय रिव्ह्यू

नमस्कार, नवनवीन मराठी चित्रपटांच्या भाऊगर्दीत लक्षवेधक व हटके चित्रपट म्हणून नुकताच प्रदर्शित झालेला दिग्दर्शक विजय पगारे यांच्या 'बाय गो बाय' या चित्रपटाचा उल्लेख करावा लागेल. आजच्या काळात स्त्री-पुरूष समानता असली तरी खेडोपाडयात मात्र आजही पुरुषी वर्चस्व आढळून येते. असे असताना   बायकांचे वर्चस्व असलेल्या गावाची गोष्ट सांगणारा हा चित्रपट म्हणजे खरोखरच विनोदाची व धमाल करमणूकीची भेळ आहे. बैजाक्काच्या सशक्त भूमिकेत 'निर्मिती सावंत' यांनी आपले अभिनय कलागुण पुन्हा एकदा सिद्ध केले आहेत. संपूर्ण चित्रपटात भाव खाऊन जातो तो नायक 'नयन जाधव'! आतापर्यंत वेगवेगळ्या नाटक चित्रपटात सहाय्यक व्यक्तीरेखा साकारलेला 'नयन जाधव' यांनी नायक म्हणून आपल्या पहिल्याच चित्रपटात अभिनयाचे चौकार, षटकार ठोकले आहेत. त्यांचा विनोदी अभिनय बघताना आजच्या मराठी चित्रपट सृष्टीतील 'लक्ष्मीकांत बेर्डे' म्हणून त्यांचा उल्लेख करता येईल.

Dec 1, 2015

असंवेदनशील वृत्ती

शनिवारी लोकलट्रेन मधे गर्दीत तोल सांभाळू न शकल्यामुळे एका प्रवाशाचा झालेला मृत्यू सगळ्यांनाच चटका लावणारा आहे. या प्रवाशाची लोकलमध्ये शिरण्याचा प्रयत्न दाखवणारी व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली व त्याची शेवटच्या क्षणापर्यंतची जगण्याची काळजाचे ठोके चुकवणारी धडपडही सर्वानी बघितली. यातील रेल्वे प्रशासनाची चुक किती, काय, पुढील काळात या बाबतीत उपाययोजना काय आहेत हा तर चर्चेचा विषय आहेच परंतु आश्चर्य वाटते ते सहप्रवाशांच्या वृत्तीचे! ज्या वेळी हा प्रवासी लोकांना मदतीचे आवाहन करत होता, लोकलच्या गर्दीत आत जागा देण्याची विनंती करत होता तेव्हा त्याच वेळी एक सहप्रवासी या प्रसंगाचे चित्रीकरण करत होता. हा सर्व प्रकार मन विषण्ण करणारा आहे. अशा वेळेचे चित्रीकरण करणार्‍यांची मानसिकता नक्की काय असते? हा असंवेदनशीलपणा किंवा अपघातग्रस्त, मृतांसोबत सेल्फी काढण्याचा प्रकार म्हणजे मानवी भावना बोथट झाल्याचे  एक भयंकर उदाहरण आहे.