Sep 30, 2015

अद्ययावत रेल्वे

रेल्वेने मोबाईल वरून तिकीट व पास उपलब्ध करून दिलेली पेपरलेस तिकीट यंत्रणा स्वागतार्ह आहे. दररोज
वाढती प्रवासी संख्या व त्या तुलनेत कमी असणाऱ्या तिकीट खिडक्या यामुळे कोणत्याही वेळी दिसणार्‍या लांबलचक रांगा
या सुविधेमुळे कमी होण्यास मदत होईल.

परिक्षेला जाणारे विद्यार्थी, वृद्ध व अपंग तसेच अत्यावस्थ व्यक्तींना या सुविधेचा निश्चित फायदा होईल.

मात्र आयआरसीटीसीची वेबसाईट वापरताना येणाऱ्या अडचणी इथे येऊ नयेत ही अपेक्षा आहे.

प्रगत तंत्रज्ञानाचा योग्य वापर केल्यास ही योजना नक्कीच यशस्वी होईल.

Sep 9, 2015

बाळंतिणीला 'स्नेहभेट'

डॉक्टरांनी अधोरेखित केलेले एक वाक्य खरोखरच खूप महत्वाचे आहे ते म्हणजे  'बाळंतिणीला 'स्नेहभेट' देणारी मंडळी फक्त स्नेहच का देत नाहीत? सल्ले का देतात? अशा हितचिंतक मंडळींनी आपल्याला न समजणाऱ्या विषयातले अनाहूत सल्ले देणं किंवा नुकत्याच जन्मलेल्या बाळाचं मूल्यमापन करणं बंद केलं पाहिजे'.

बाळंतपण म्हणजे स्त्रीचा पुनर्जन्म असे म्हटले जाते. त्यात जर सिझेरियन असेल तर त्या नंतर
रक्‍ताच्या कमतरतेमुळे आलेला अशक्तपणा, शरीराची झालेली झीज, बाळाचे आपल्या कडुन सर्व नीट कसे होईल याचे दडपण यामुळे
आई व ओघाने
बाळाचे बाबा दोघेही ही एका शब्दातीत मानसिक परिस्थितीतून जात असताना
नितांत गरज असते ती भक्कम आधार व पाठिंबा याचीच!

वेळीच हा आधार दिला गेला तर आईचे मनोस्वास्थ्य ही जपले जाईल व बाळालाही सुद्रुढ व निरोगी आयुष्य लाभेल.

Sep 2, 2015

जुळून (ओढून) येती रेशीमगाठी

लोकप्रियतेच्या शिखरावर असलेली कोणतीही मालिका वेळीच संपवली तर त्या मालिकेची गोडी टिकून राहील व ती प्रेक्षकांच्या दिर्घकाळ स्मरणातही राहील. परंतु सध्या सुरू असलेल्या मालिकांमध्ये या गोष्टीचा विचार केला जात नसल्याचे दिसून येते.

'जुळून येती रेशीमगाठी' ही एक उत्तम कथा पटकथा असलेली मालिका खरतर खुप आधीच संपवायला हवी होती परंतु निरनिराळे नवनवीन ट्रॅक आणत व कथेत पाणी घालत ही मालिका भरकटली गेली.

आता शेवटचे काही भाग उरलेले असताना "चवळी भिजत घालू की मटकी" इथपासून ते "डास असतील तर गुडनाईट लाव" अशा मालिका प्रायोजक वस्तूंच्या जाहिराती करून निरर्थक पणे वेळ मारून नेली जात आहे.