Oct 3, 2016

घालीन लोटांगण

आमच्याकडे गणेशोत्सव आणि नवरात्र दोन्ही कुळधर्म भक्तिभावाने साजरे केले जातात. या कुळधर्मात मला प्रचंड आवडतात त्या आरत्या..... आरतीच्या ठराविक वेळी घराघरांत निरनिराळ्या आरत्यांचे सुर ऐकु आले की मनातल्या मनात अगदी नास्तिक माणूस देखील त्यातील दोन शब्द म्हणुन जातो. गाता येवो न येवो, पोटतिडकीने, हातात ताम्हण, झांज, अगदी ताटली चमचा जे असेल ते वाजवत आरती म्हणणे हीच तर आपली खरी संस्कृती आहे. काही लोक मला खरच खूप ग्रेट वाटतात. . कारण वर्षभरात एकदाही एकही आरत्या न म्हणता देखील यांना त्या अगदी पहिल्या दिवसांपासून 100% आरत्या पाठ असतात. पण काही जणांना ( माझ्या सारखे ) 'त्रिभुवनी भुवनी पाहता' आधी की 'प्रसन्न वदने प्रसन्न होसी' आधी हे कन्फ्युजन दसऱ्यापर्यंत कायम असते.  मग नवरात्रीची दहा कडव्यांची आरती पाठ करणे म्हणजे 29 चा पाढा पाठ करण्या इतके अवघड नव्हे तर अशक्य काम! बर्‍याच घरात आरती म्हणण्याची पध्दत, चाल वेगवेगळी असते. अशा घरात आपण कोणाकडे पाहुणे म्हणून गेलो किंवा आपल्याकडे कोणी आले, की आरती म्हणताना धमाल गोंधळ उडतो. उदाहरणार्थ जयदेव जयदेव जय श्री शंकरा नंतर काही जण स्वामी शंकरा म्हणत असतानाच काही जण भावार्थी उवाळू पर्यंत पोहोचलेले असतात.  किंवा अच्युतम केशवम 'स्लो' म्हणायचे की 'फास्ट' हे ही ठरलेले नसल्याने अजून एक गोड गोंधळ. अशीच मजा "पंढरपुरी आहेsssss" वगैरे ओळ म्हणताना येते. काही घरांमध्ये मात्र आरत्या करायला महा कंटाळा करणारी माणसे पाहायला मिळतात. आज नको उद्या मोठी आरती करू, आज दोनच आरत्या करू चारच आरत्या करू असा हिशोब करणारे लोक बघितले की फक्त देखावा करण्यासाठी एवढे तरी का करतायत हे लोक असे वाटते. बरोबर की नाही? बाकी' पिढ्या बदलल्या, काळ बदलला,  तरी 'घालीन लोटांगण' म्हणण्या साठी आतुरतेने वाट बघणारी व नंतर प्रसाद वाटायला तत्परतेने तयार असणारी घराघरातील किंवा सार्वजनिक उत्सवाच्या ठिकाणची लहान मुले पाहीली की खुप खुप छान वाटते. आपल्या लहानपणचा काळ थांबल्या सारखा वाटतो. आपणही हेच करत होतो की! असं वाटतं आणि मन भरून येतं. बरोबर ना? .

No comments:

Post a Comment