Apr 27, 2015

नाट्यगृहाचे अपडेशन

एकीकडे नाटक बघायला प्रेक्षक फिरकत नसल्याचे म्हणताना दरवर्षी नाटकाचे दर मात्र वाढविण्यात येतात.

आजच्या काळात अखंडितवातानुकूलित यंत्रणा, आरामदायी खुर्च्या, स्वच्छ प्रसाधनगृहे, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था,सुसज्ज उपाहारगृह, अशा गोष्टींनी सज्ज असलेल्या मल्टिप्लेक्स चित्रपटगृहांच्या
दराएवढे नाट्यगृहाचे दर आहेत. मात्र त्या तुलनेत नाट्यगृहांच्या सोयी सुविधेत वर्षानुवर्षे काहीही नाविन्यपूर्ण बदल नाही.

अशा स्थितीत मल्टिप्लेक्स थिएटरच्या दराएवढेच पैसे मोजून नाटक पाहायला जाणार्‍या प्रेक्षकांचा नाट्यगृहाची परिस्थिती व उपलब्ध सोयी सुविधा बघून
अपेक्षाभंग झाला तर नवल नाही. सध्या
जो प्रेक्षक वर्ग नाटक बघायला जात आहे तो
केवळ नाटकावरील प्रेमापोटी! ही प्रेक्षक संख्या वाढण्या साठी व खासकरून तरूण प्रेक्षकांना नाट्य गृहाकडे
आकर्षित करण्यासाठी नाट्य गृहाच्या सोयी सुविधा 'अपडेट' करणे गरजेचे आहे. 

सोशल नेटवर तारतम्य

झेवियर्स मधील प्राध्यापक व प्रिन्सिपल यांच्यातील वाद सोशल मीडियातून जगजाहीर होणे ही निश्चितच अयोग्य बाब आहे.

समोरासमोर बसून सामंजस्याने जो प्रश्न सोडवला जाऊ शकतो तो अशा पद्धतीने सोशल मीडियामध्ये आणून उगाचच ताणला जातो.

सोशल नेटवर्किंग साइट्स या आपले मत व विचार व्यक्त करण्यासाठी आहेत हे खरे असले तरीही आपले कोणते मत कुठे आणि कशा पद्धतीने मांडायचे याचे तारतम्य बाळगणे ही तितकेच महत्त्वाचे आहे.

समाजात सन्माननीय मानल्या जाणाऱ्या व नवीन पिढी घडवणार्‍या शिक्षकी पेशातील व्यक्तींनी याची जाण व भान ठेवून फेसबुक, ट्विटर आदी साईट्सवर आपले मत प्रदर्शन करावे. 

Apr 7, 2015

का रे दुरावा

'का रे दुरावा' या मालिकेत बरेच एपिसोड चाललेला कदमकाकांना काँप्युटर शिकवायला ट्रॅक आता कंटाळवाणा होत चालला आहे. काही त्रुटी यात प्रामुख्याने जाणवून येतात.

ऑफिसच्या कामासाठीच जर काँप्युटर शिकायचा आहे तर जय आणि आदिती
बाॅसची रितसर परवानगी काढून ऑफिस मध्येच का नाही शिकवत?

परवानगी नाही असे धरून चालले तरी एखाद्या सायबर कॅफे मध्ये बसून शिकवायचा पर्याय का नाही निवडत?

शिवाय जर लॅपटॉप वरच शिकवायचे आहे तर बाहेर कुठेही बसून शिकवले जाऊ शकते त्या साठी अंबरनाथला राहणारे कदमकाका ऑफिस पासून आणखी दूर वांद्र्याला जयच्या घरी जाऊन शिकण्याचा खटाटोप का करत आहेत?

तसेच इतर स्टाफ पासून लपवण्यासारखे  यात काय आहे?