Feb 22, 2016

जय मल्हार मध्ये 'लॅब्रेडाॅर'!!!

दूरदर्शनच्या रामायण व महाभारत या मालिकांपासून देवादिकांच्या मालिकेचा ट्रेंड प्रेक्षकांनी आपलासा केला. सध्या झी वाहिनीवर सुरू असलेली 'जय मल्हार' ही पौराणिक मालिका  देखील जगभरातील मराठी जनमानसात लोकप्रिय झाली आहे. मालिकेतील पात्रे, त्यांचे पेहराव आणि भाषा, संबंधित देखावे इत्यादी अनेक गोष्टी हुबेहूब पुरातन पध्दतीने करण्याचा प्रयत्न निर्मात्यांनी केला आहे.  याच मालिकेत मागील आठवडय़ात प्रक्षेपित करण्यात आलेल्या एका भागात जेजुरीत वाजतगाजत श्वान राजाचे आगमन झाले. परंतु  'मल्हारी मार्तंड' देवाच्या दरबारात आलेले हे 'श्वान राजे' चक्क 'लॅब्रेडाॅर' रुपात अवतरले.   कलीयुगात येणार्‍या आपल्या विदेशी अवताराची श्वान महाराजांनी पुराणातच झलक दाखवली होती असं बहुदा लेखक महाशयांना सूचित करायचे असावे. वास्तविक पाहता ही श्वान प्रजाती इंग्रजांनी भारतात आणली त्यामुळे मालिकेतील प्रसंगात हे श्वान भारतीय प्रजातीचे असले पाहिजे होते. सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली असल्या गोष्टी दाखवणं आपण कधी थांबवणार आहोत? 

Feb 19, 2016

जाहिरातींचाच कार्यक्रम

प्रत्येक वाहिनीवर विविध वस्तूंच्या जाहिरातींचा नेहमीच भडिमार सुरू असतो. पुर्वी मालिकेच्या/बातम्यांच्या ब्रेक मध्येच दाखवण्यात येणार्‍या या जाहिराती आता त्या पुढील पायरी म्हणून कार्यक्रम सुरू असतानाच स्क्रोलर/स्लायडरच्या रूपात अवतरत आहेत.  एक किंवा कधीकधी दोन स्क्रोलर जाहिरातींमुळे दुरचित्रवाणी पडद्याचा निम्मा अधिक भाग व्यापला जातो. त्यामुळे कार्यक्रमात जाहिराती सुरू आहेत की जाहिरातींमध्ये कार्यक्रम दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय असा संभ्रम निर्माण होतो. न्युज चॅनेल वर तर या अतिरेकाचा उच्चांक गाठला जातो.  केव्हा कोणती जाहिरात दाखवावी या बद्दल कसलेही निकष नसल्याने एखादी गंभीर, दुःखद बातमी वाचली जात असताना समोर नाच, गाणं, खाद्य पदार्थ आदिं ची जाहिरात बघावी लागते. अलिकडेच घडलेल्या सियाचिन दुर्घटनेची माहिती दिली जात असता खालील स्क्रोलर वर खमंग खाद्य पदार्थ व तत्सम जाहिरात प्रक्षेपित करण्यात आली. सामाजिक बांधिलकी म्हणून वाहिन्यांनी याबाबतीत विशेष तारतम्य बाळगणे आवश्यक आहे.

Feb 16, 2016

माझे पती सौभाग्यवती

सुजाण प्रेक्षकांची नस ओळखून करमणूकीच्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान करणार्‍या व अविस्मरणीय मराठी मालिकांच्या जगतातील एक महत्त्वाचं नाव म्हणजे मंदार देवस्थळी! 'माझे पती सौभाग्यवती' ही त्यांची नवीन मालिका देखील त्याच्या विषयातील व सादरीकरणातील वेगळेपणामुळे दिवसेंदिवस लोकप्रिय होत आहे. पठडीपेक्षा वेगळे कथानक, मध्यमवर्गीय दर्शकांना जवळचे वाटणारे व्यक्तीचित्रण हा या मालिकेचा 'युएसपी' तर आहेच पण त्याही पेक्षा नाविन्य पूर्ण गोष्ट म्हणजे त्यात दाखवले जाणारे दिग्दर्शनाविषयीची माहिती! मालिकेतील मालिकेच्या शुटींग निमित्ताने दिग्दर्शक व बॅक स्टेजला असणार्‍या कलाकारांचे काम, त्यांची मेहनत व एक चांगली कलाकृती लोकांसमोर आणण्यासाठी लागणारे दिग्दर्शकीय 'स्किल' पाहायला मिळते. आतापर्यंत कोणत्याही माध्यमातून हे 'टेक्निकल नो-हाउज' दाखवले गेले नाहीत.  बॅकस्टेज चे हे पैलू उलगडून दाखवण्याचा हा स्तुत्य प्रयत्न वाखाणण्याजोगा आहे.

Feb 10, 2016

पोस्ट वर तुमचा अभिप्राय, मत नक्की नोंदवा

Feb 8, 2016

होम मिनिस्टर

'दार उघड बये, दार उघड' अशा आरोळीच्या शीर्षक गीताने गेली बारा वर्षे महाराष्ट्रातील घराघरात नित्य नेमाने आनंदाची उर्जा घेऊन येणारे 'आदेश बांदेकर' यांचे प्रकृती अस्वास्थ्या नंतरचे जोरदार पुनरागमन बघून समस्त महिला वर्गाचे काळीज आनंदाने सुपाएवढे झाले. महिनाभराच्या विश्रांतीनंतर एक तासाच्या महाएपिसोडने पुन्हा सुरूवात झालेल्या या कार्यक्रमात त्यांचा 'विषाची परिक्षा' देण्याचा अनुभव त्यांच्याच शब्दातून ऐकताना सर्वांच्याच डोळ्यांच्या कडा ओलावल्या. या महाएपिसोड ची सांगताही कार्यक्रमाच्या लौकिकाला साजेशी अशीच झाली. विजेती आणि अविजेती झालेल्या दोन्ही स्पर्धकांना सौहार्दाचे प्रतीक म्हणून मानाची पैठणी देऊन गौरविण्यात आले. या अनपेक्षित निर्णयाने होम मिनिस्टर या कार्यक्रमाविषयीची आत्मियता व अनुषंगाने 'आदेश भाऊजीं' बद्दलचा आदर द्विगुणित झाला. या पुढे देखील होम मिनिस्टर ची वाटचाल अखंड सुरू राहो व आदेश भाऊजींची प्रकृती उत्तम राहो हीच सदिच्छा!