Apr 1, 2016

विराट आणि अनुष्का

आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विजयी सामन्यात विराट कोहलीने सिंहाचा वाटा उचलला. त्याबद्दल त्याच्यावर सर्व स्तरावरून कौतुकाचा वर्षाव होतोय. मात्र, विराटचे अभिनंदन करत असताना मिडिया मध्ये अनुष्काची खिल्ली उडवण्याचा प्रकार संतापजनक आहे. अनुष्काशी 'ब्रेक-अप' झाल्यामुळेच विराट फॉर्मात आलाय अशा प्रकारचे मेसेजेस पसरवणे म्हणजे अप्रत्यक्षपणे अथवा काही अंशी प्रत्यक्षपणे एका स्त्रीला दुर्भाग्यकारक आणि अपशकुनीच म्हटले गेले आहे. सोशल मीडियामध्ये असे 'अनुष्का विरोधी' जोक्स करण्याऱ्यांचा विराट कोहली ने खडसावून समाचार घेताना आपली नाराजी व्यक्त केली व  तुमची बहीण, पत्नी किंवा गर्लफ्रेंडवर कुणी जोक केले, जाहीरपणे तिची खिल्ली उडवली तर कसं वाटेल, याचा जरा विचार करा, असा सुसंस्कृत सल्लाही दिला. तरी हा विषय नक्कीच इथे संपलेला नाही. कोणत्याही पुरूषाच्या यशाला व अपयशाला त्याच्या स्त्री-जोडीदाराला जबाबदार ठरवणे ही पूर्वापार चालत आलेली एक खेदाची बाब आहे. वाईट पायगुणाची, पांढर्‍या पायाची अशा घृणास्पद संबोधनांनी कायमच तिच्या स्त्रीत्वाचा अपमान केला गेला आहे. सखेद आश्चर्याची बाब म्हणजे शेकडो वर्षापासून जनमानसात खोलवर रूजलेली ही विचारसरणी आजच्या आधुनिक काळात, प्रगल्भ आणि प्रगत मानल्या जाणार्‍या जगातून अजूनही लोप पावलेली नाही. आजची स्त्री स्वत च्या पायावर खंबीर उभी राहणारी,  स्वतःला सिद्ध करण्यासाठी जंग जंग पछाडणारी आहे. कोणत्याही क्षेत्रात अंखंड कार्यक्षमतेने उल्लेखनीय कामगिरी करताना  पुरूषापेक्षा काकणभरही कमी नाही हे या 'अॅडव्हान्स्ड' विनोदवीरांना व समाजातील सर्व घटकांना परत परत सांगण्याची गरज खरतर नाहीये. कारण ही निश्चितच सर्वश्रुत व सर्वमान्य बाब आहे. या प्रकरणातील स्वतः 'अनुष्का शर्मा' देखील चित्रपटसृष्टीतल्या 'खान' आणि 'कपूर' साम्राज्यातील स्वयंसिद्धा अभिनेत्री आहे. त्यामुळे असे स्त्री विरोधी लिखाण करणार्‍या व ते पसरवणारया समाज घटकांना आत्म परिक्षण करण्याची व अंतर्मुख होऊन विचार करण्याची आता खरोखरच गरज आहे.

No comments:

Post a Comment