Dec 1, 2015

असंवेदनशील वृत्ती

शनिवारी लोकलट्रेन मधे गर्दीत तोल सांभाळू न शकल्यामुळे एका प्रवाशाचा झालेला मृत्यू सगळ्यांनाच चटका लावणारा आहे. या प्रवाशाची लोकलमध्ये शिरण्याचा प्रयत्न दाखवणारी व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली व त्याची शेवटच्या क्षणापर्यंतची जगण्याची काळजाचे ठोके चुकवणारी धडपडही सर्वानी बघितली. यातील रेल्वे प्रशासनाची चुक किती, काय, पुढील काळात या बाबतीत उपाययोजना काय आहेत हा तर चर्चेचा विषय आहेच परंतु आश्चर्य वाटते ते सहप्रवाशांच्या वृत्तीचे! ज्या वेळी हा प्रवासी लोकांना मदतीचे आवाहन करत होता, लोकलच्या गर्दीत आत जागा देण्याची विनंती करत होता तेव्हा त्याच वेळी एक सहप्रवासी या प्रसंगाचे चित्रीकरण करत होता. हा सर्व प्रकार मन विषण्ण करणारा आहे. अशा वेळेचे चित्रीकरण करणार्‍यांची मानसिकता नक्की काय असते? हा असंवेदनशीलपणा किंवा अपघातग्रस्त, मृतांसोबत सेल्फी काढण्याचा प्रकार म्हणजे मानवी भावना बोथट झाल्याचे  एक भयंकर उदाहरण आहे.

No comments:

Post a Comment