Apr 19, 2016

गाभारा प्रवेश

शनी चौथरा असो वा महालक्ष्मी गाभारा किंवा इतर कुठल्याही देवस्थानात महिला प्रवेश हा खरंतर रुढी परंपरेनुसार चालत आलेला भावनिक मुद्दा! काही संघटनांच्या संघर्षामुळे तो मोडीत निघाला आणि अखेर महिला प्रवेश बंदीचा नियम बदलला गेला. ही एका अर्थी चांगली कामगिरी असली तरी देखील अशा प्रकारची भावनिक स्वरूपाची बंधने दुर करण्यासाठी राज्य घटना,  न्यायालयीन व्यवस्थेला समाविष्ट करून कायदेशीर कारवाईने हा प्रश्न सोडवण्याची गरज होती असे वाटत नाही. कायदा व सुव्यवस्था अंतर्गत कोणत्याही कलमान्वये स्त्रियांवर प्रवेश बंदीचा नियम नाही. त्यामुळे न्यायालयात स्त्रीयांसंबंधित असलेले विनयभंग, हुंडाबळी, छेडछाड यासारखे अनेक गंभीर खटले त्याचप्रमाणे स्त्री प्रसाधनगृहांची आवश्यक संख्या, आत्महत्याग्रस्त विधवा शेतकरीपत्नीच्या उदरनिर्वाहाचे साधन, दुष्काळीभागात कोसो दुर चालून पाणी मिळवण्यासाठी महिलांची होणारी परवड आणि त्यात होणारे अतोनात हाल असे मुद्दे वर्षानुवर्षे प्रलंबित असताना, देवाधिदेवांच्या दर्शनाची बाब ऐरणीवर आणून न्याय व्यवस्थेचा महत्वाचा वेळ खर्ची घालणे हे कितपत योग्य आहे याचा विचार व्हायला हवा.

का रे दुरावा

नमस्कार, झी वाहिनीवर सुरू असलेली 'का रे दुरावा’ही मालिका अखेर संपली. जय आणि आदितीच्या लग्नाबद्दल ऑफिसमध्ये कळल्यानंतर नक्की काय होणार, याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये होती. परंतु या मालिकेचा शेवट बघून कमालीचा भ्रमनिरास झाला. अनेक प्रश्न अनुत्तरित ठेवून व त्यातील व्यक्तीरेखांचे स्वभाव रातोरात बदलून मालिका अक्षरशः गुंडाळण्यात आली. रजनी आणि अनिल दाभोळकरांना अचानक उपरती होऊन झालेले हृदय परिवर्तन,  कायम हळव्या दाखवल्या गेलेल्या जुईची जयचे सत्य समजल्यावरही 'शुन्य' प्रतिक्रिया, जयआदिती प्रमाणेच 'नवरेंचे' लपवलेले लग्न, 'शोभा'च्या नवर्‍याचे म्हणजेच जयच्या भावाचे कर्ज प्रकरण व विनाकारण मालिकेतून गायब केलेला लहानगा 'चिनू', कधीही मालिकेत प्रत्यक्ष न आलेला परंतु या ना त्या कारणाने प्रेक्षकांना सतत ऐकवला गेलेला केतकरांचा परदेशस्थ मुलगा, लग्न लपवण्यासाठी आदितीच्या घटस्फोटाच्या कहाणीचा सरतेशेवटी अपेक्षित असलेला परंतु दुर्लक्षीत केलेला उल्लेख अशा कितीतरी गोष्टी खटकल्या. "आणि ते सर्वजण सुखाने नांदू लागले, साठा उत्तराची  कहाणी  पाचा उत्तरी  सफळ संपूर्ण" या धर्तीवर केलेला

https://www.facebook.com/tumchaamchsamechasta/

For Such Many More Interesting Quotes And Posts, Please Visit/Like/Share My Facebook Page. https://www.facebook.com/tumchaamchsamechasta/

Apr 1, 2016

विराट आणि अनुष्का

आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विजयी सामन्यात विराट कोहलीने सिंहाचा वाटा उचलला. त्याबद्दल त्याच्यावर सर्व स्तरावरून कौतुकाचा वर्षाव होतोय. मात्र, विराटचे अभिनंदन करत असताना मिडिया मध्ये अनुष्काची खिल्ली उडवण्याचा प्रकार संतापजनक आहे. अनुष्काशी 'ब्रेक-अप' झाल्यामुळेच विराट फॉर्मात आलाय अशा प्रकारचे मेसेजेस पसरवणे म्हणजे अप्रत्यक्षपणे अथवा काही अंशी प्रत्यक्षपणे एका स्त्रीला दुर्भाग्यकारक आणि अपशकुनीच म्हटले गेले आहे. सोशल मीडियामध्ये असे 'अनुष्का विरोधी' जोक्स करण्याऱ्यांचा विराट कोहली ने खडसावून समाचार घेताना आपली नाराजी व्यक्त केली व  तुमची बहीण, पत्नी किंवा गर्लफ्रेंडवर कुणी जोक केले, जाहीरपणे तिची खिल्ली उडवली तर कसं वाटेल, याचा जरा विचार करा, असा सुसंस्कृत सल्लाही दिला. तरी हा विषय नक्कीच इथे संपलेला नाही. कोणत्याही पुरूषाच्या यशाला व अपयशाला त्याच्या स्त्री-जोडीदाराला जबाबदार ठरवणे ही पूर्वापार चालत आलेली एक खेदाची बाब आहे. वाईट पायगुणाची, पांढर्‍या पायाची अशा घृणास्पद संबोधनांनी कायमच तिच्या स्त्रीत्वाचा अपमान केला गेला आहे. सखेद आश्चर्याची बाब म्हणजे शेकडो वर्षापासून जनमानसात खोलवर रूजलेली ही विचारसरणी आजच्या आधुनिक काळात, प्रगल्भ आणि प्रगत मानल्या जाणार्‍या जगातून अजूनही लोप पावलेली नाही. आजची स्त्री स्वत च्या पायावर खंबीर उभी राहणारी,  स्वतःला सिद्ध करण्यासाठी जंग जंग पछाडणारी आहे. कोणत्याही क्षेत्रात अंखंड कार्यक्षमतेने उल्लेखनीय कामगिरी करताना  पुरूषापेक्षा काकणभरही कमी नाही हे या 'अॅडव्हान्स्ड' विनोदवीरांना व समाजातील सर्व घटकांना परत परत सांगण्याची गरज खरतर नाहीये. कारण ही निश्चितच सर्वश्रुत व सर्वमान्य बाब आहे. या प्रकरणातील स्वतः 'अनुष्का शर्मा' देखील चित्रपटसृष्टीतल्या 'खान' आणि 'कपूर' साम्राज्यातील स्वयंसिद्धा अभिनेत्री आहे. त्यामुळे असे स्त्री विरोधी लिखाण करणार्‍या व ते पसरवणारया समाज घटकांना आत्म परिक्षण करण्याची व अंतर्मुख होऊन विचार करण्याची आता खरोखरच गरज आहे.

राजकारण नव्हे, खेळ महत्वाचा

टी-ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलिया बरोबरच्या सामन्यात  पाकिस्तानी संघाचा अत्यंत दारूण पराभव झाला. सामन्यानंतरच्या मुलाखतीतील  कर्णधार 'शाहिद आफ्रिदीने' काश्मिरी जनतेचे आभार मानले. "आम्हाला खेळताना काश्मिरी क्रिकेटप्रेमींचा मोठा पाठिंबा मिळाला" असे म्हणून त्याने त्याबद्दल जाहीर आभार प्रदर्शन केले. हे विधान करण्यामागचे त्याचे उद्दिष्ट व विचारधारा काय आहे हा एक संपूर्ण वेगळा चर्चेचा विषय असला तरी काश्मीर हे भारताचेच अविभाज्य अंग आहे हे आफ्रिदीने लक्षात घ्यावे. सध्या तरी, राजकारण आणि खेळ या सर्वस्वी दोन वेगळ्या विषयाची सरमिसळ न करता स्वतःच्या व संघाच्या खेळ पट्टी वरील कामगिरीवर लक्ष केंद्रित करणे जास्त उचित ठरेल.

दिलदार अक्षय कुमार

एबीपी माझा वरील 'माझा कट्टा' या कार्यक्रमात अलीकडेच सुपरस्टार अक्षय कुमारने हजेरी लावली. अक्षय कुमारची संवेदनशीलता त्याने आपल्या चर्चेत नमुद केलेल्या अनेक मुद्यांमध्ये दिसुन आली. राज्यातील दुष्काळ आणि त्यामुळे शेतकरीवर्गावर ओढवलेली परिस्थिती, वाढत्या आत्महत्या, त्यांच्या मदतीसाठी आवश्यक निधी यावर त्याने परखडपणे आपली मनस्वी मते मांडली. आपल्या उत्पन्नातील निम्मा वाटाही शेतकऱ्याला देण्याची तयारी असल्याचे दिलदारपणे खुलेआम केलेले विधान वाखाणण्याजोगे आहे. त्याचं व्यक्तिगत आयुष्य, त्याचे चित्रपट, पडद्यामागच्या कलाकारांची विशेषतः स्टंटमॅनची मेहनत, महिला सशक्तीकरण व समानता आणि देशातली राजकीय परिस्थिती ह्याही विषयांवर तो दिलखुलासपणे बोलला. आपला कुठलाही चित्रपट किंवा मालिका प्रदर्शनाच्या मार्गावर नसताना एखाद्या कलाकाराने अशा कार्यक्रमात हजेरी लावणे आजकाल दुर्मीळच!