Jun 27, 2015

सिध्दी विनायकास आय एस ओ प्रमाणपत्र

मुंबईतील श्री सिध्दीविनायक मंदीर न्यासाला सुरक्षित, विश्वासार्ह व पारदर्शक सेवेसाठी आयएसओ प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले ही तमाम मुंबईकरांसाठी आनंदाची व अभिमानाची बाब आहे. या आयएसओ प्रमाणपत्राचा अर्थ व सविस्तर विश्लेषण महाराष्ट्र टाईम्सने सामान्य माणसाला कळेल अशा सोप्या भाषेत दिले आहे.

श्री सिध्दीविनायक मंदिराचा परिसर दररोजच गर्दीने ओसंडून वाहत असतो तरी कोणत्याही परिस्थितीत मंदिरातील शिस्तबद्धता ढळली जात नाही. एक प्रकारे या आयएसओ प्रमाणपत्राने  देवस्थाला दिलेल्या देणग्या, अभिषेक-पूजा आदी नित्य देवधर्मासाठी अर्पण करण्यात आलेली दक्षिणा याचा सदुपयोग होत असल्याची हमीच दिली आहे.


मराठी माणसाची भक्तीपीठे असणार्‍या पंढरपूर, तुळजापूर आदी इतर देवस्थान न्यासांनी या गोष्टीचा आदर्श जरूर डोळ्यासमोर ठेवावा.

Jun 15, 2015

माध्यान्ह भोजनाचा दर्जा

महाराष्ट्र शासनाकडून जिल्हा परिषद शाळाविद्यार्थ्यांना मध्यान्ह जेवण देण्यात येते. विद्यार्थ्यांना बेचव आणि निकृष्ट जेवण घ्यावे लागणार नाही म्हणून  मॅगी प्रमाणेच त्या अन्नपदार्थांचीही वेळोवेळी कडक तपासणी व कारवाई करण्यात यावी.

पोषक व नियमित दर्जेदार आहार यामुळे
विद्यार्थ्यांची उपस्थिती व त्यांचे आरोग्य दोन्ही गोष्टींना प्राधान्य दिले जाईल. 

Jun 5, 2015

सेवा करात वाढ

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अर्थंसंकल्पानुसार सेवाकरात झालेली  दीड टक्क्यांची वाढ म्हणजे सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलीच कात्री बसणार आहे.

एकीकडे राज्य सरकारने 12 टोलनाके बंद करुन सामन्यांना दिलासा दिला तर दुसरीकडे आजपासून सेवाकरात वाढ होणार असल्याने
त्यामुळे सामान्यांना महागाईचा सामना करावा लागणार आहे.

थोडक्यात सामान्य नागरिकांचे बुरे दिन सुरु होणार आहे.

Jun 4, 2015

टि एम टि बद्दल

हार्बर, सेंट्रल व घोडबंदर रोड तर्फे पश्चिम मुंबईला जोडणाऱ्या ठाणे शहराचा विस्तार व लोकसंख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. परंतु ठाणेकरांसाठी सध्या सुरू असलेली बस व रिक्षा वाहतूक व्यवस्था मात्र त्या तुलनेत सक्षम नाही.

ठाणे स्टेशनच्या बाहेरील टीएमटी बस स्थानकावरच याचा प्रत्यय येतो. प्रवाशांची तुफान गर्दी, बस थांब्यावरील अपूरे शेडिंग, वेळापत्रक व बसचे मार्ग
यातील नियोजनाचा अभाव यामुळे सामान्य नागरिक त्रस्त आहेत. आबालवृद्ध, अपंगांसाठी या गर्दीतून वाट काढून बस मध्ये चढणे हे अत्यंत जिकिरीचे काम असते.
बसच्या वेळा आणि त्यातील बदल याविषयी कोणत्याही प्रकारची घोषणा करण्यात येत नाही.

रिक्षाचे वाढते दर व रिक्षा चालकांची मनमानी यामुळे सर्व सामान्य लोकांना टीएमटीच्याच बसचा आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे नियोजनबद्ध पद्धतीने टीएमटीने वेळापत्रक आखले तर नागरिकांना दिलासा मिळेल व प्रवास सुकर होईल.

मॅगी बद्दल

मॅगी नूडल्समध्ये शरीरास हानिकारक घटक आढळल्यानंतर या उत्पादनाची जाहिरात करणाऱ्या प्रख्यात सेलिब्रिटींवर गुन्हा दाखल करण्याचे व गरज पडल्यास अटक करण्याचे  आदेश जारी झाले. या सर्व प्रकरणात  अमिताभ बच्चन, माधुरी दीक्षित आणि प्रीती झिंटा यांची प्रतिक्रिया अत्यंत संतापजनक आहे.
'आम्ही काही वर्षांपूर्वी मॅगीची जाहिरात करत होतो, आता आमचा मॅगीशी काहीही संबंध नाही' असे त्यांचे बेजबाबदार विधान सर्व फॅन्स साठी धक्कादायक व अनपेक्षितच आहे.

खाद्य पदार्थ वा इतर तत्सम पदार्थांचा खप आणि विक्री वाढवण्यासाठी भरपूर मोबदला देऊन लोकांच्या आवडत्या कलाकारांकडून त्याची जाहिरात केली जाते. टिव्ही हे एक प्रभावी दृकश्राव्य माध्यम आहे. त्याचा प्रभावही दिर्घ काळ टिकणारा आहे. एखाद्या कलाकाराने अल्पावधीत केलेली जाहिरात सुद्धा चाहत्यांना स्मरणात राहते. याचा थेट परिणाम त्याने जाहिरात केलेल्या वस्तूच्या दिर्घ काळ विक्रीवरही होतो. या सर्व पार्श्वभूमीवर कोर्टाने जारी केलेले आदेश यथायोग्य आहेत. त्यामुळे मॅगी विक्री व प्रसारण संबंधित सर्व मान्यवर महोदयांनी न्याय व्यवस्थेला सहकार्य करणे हेच उचित ठरे