Sep 29, 2016

जियो जी भर के

रिलायन्स जियो ने एक अनलिमिटेड बॅटरी पण द्यायला हवी होती! बरोबर ना

मत मनोगत

तुमचे मत, तुमचे विचार आणि प्रतिक्रिया जरूर कळवा. - प्रज्ञा पंडित

बाप्पा मोरया

आजकाल घरगुती गणेशोत्सवात सजावटीवर खुपच भर देण्यात येतो. घरोघरी खूप सुंदर डेकोरेशन केले जाते. फक्त नमस्कार करण्यासाठी.. डेकोरेशनच्या गर्दीत बसलेल्या गणपती बाप्पाला शोधावे लागते, इतकेच!

काही आठवणी

School Syllabus for 1st to 8th standard is going to change again from next year! Does anyone remember the group of Gopal,Seeta,Ahmed from the 20 years back school English Syllabus? ...... Missing those stories...

विसर्जन करतात का हो

आधी काही जणांना झाड, नारळ वगैरे मध्ये गणपतीची प्रतिमा दिसायची. आता सोशल मिडियावर बरेच जण स्वयंपाकघरात लागणार्‍या आले, लसुण इत्यादी वस्तूंमध्ये दिसणारी (!) बाप्पांची छबी फॉरवर्ड करतायत. मग गणेशोत्सवाच्या विधीवत विसर्जन प्रथेनुसार बाप्पाच्या मुर्ती प्रमाणेच या आले-लसुण वगैरेचे देखील विसर्जन होत असेल का?

एकदम नवा जोक

व्हाॅट्सप वर वेगवेगळ्या गृपमध्ये 'एकदम नवा जोक' असे लिहून जवळपास पाच वर्षांपूर्वीचे विनोद पाठवणारे लोक मला Nokia 3310 वगैरेच्या काळातले वाटतात.

#लिफ्ट

इमारतीत असलेल्या लिफ्ट मध्ये "कृपया दरवाजा बंद करा" या इरिटेटींग आवाजाची निर्मिती कोणी केली? हा आवाज ऐकून लोक वैतागून तरी दार नीट बंद करतील ही सुपीक आयडिया कोणाची?

महत्वाचे काही...

नगर शहर, परिसरात किंवा जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात एखादी अनाथ, वेडसर व रस्त्यावर फिरणारी महिला असल्याचे डॉ. राजेंद्र व डॉ. सुचेता धामणे यांना कळाले की ते लगेचच त्या व्यक्तीला घेऊन येतात अन तिथपासून धामणे दाम्पत्याची सुरु होते न संपणाऱ्या वेदनांची लढाई. नगर-मनमाड रस्त्यावर अहमदनगर शहरापासून साधारण वीस किलोमीटरवरचं शिंगवे गावं. साधारण तीन हजार लोकसंख्या. या गावाला गावपण आलं ते डॉ. राजेंद्र व डॉ. सुचेता धामणे यांच्या 'इंद्रधनु' अनाथलयामुळे. या अनाथालयात तब्बल १०५ अनाथ, मनोविकलांग महिला आणि त्यांची १५ मुले कायमस्वरूपी राहत आहेत. हे सगळं कसं सुरु झालं त्याची ही गोष्ट. डॉ. राजेंद्र व डॉ. सुचेता यांचे नगर शहरात खाजगी रुग्णालय. स्वभाव संवेदनशील. त्यामुळे मदतीलाही तत्पर. एक दिवस त्यांना एक वेडसर व विकलांग महिला विष्ठा खाताना दिसली. ही गोष्ट त्यांच्या नजरेसमोरून हटेना. या महिलांचं आयुष्य नेमक काय, कसं आहे याचा विचार त्यांना स्वस्थ बसू देईना. त्यानंतर त्यांनी वेडसर, विकलांग, अपंग महिलांची सेवा करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला घरुन निघाले की या महिलांना देण्यासाठी खाद्यपदार्थ सोबत ठेवू लागले. दिवसभरात तब्बल साठ ते सत्तर अनाथ, निराधार, अपंग, मनोरुग्णांना रोजच घरचं जेवण द्यायला सुरुवात झाली. एकदा एक विकल अवस्थेतील आजीबाई त्यांना रस्त्यात दिसल्या. सारखं ‘मरायचं आहे’ असं म्हणत होत्या. त्यांच्या मुलाने त्यांना त्या मनोरुग्ण, अपंग झाल्या म्हणून रस्त्यावर टाकून दिलं होत. या आजीबाईंना डॉक्टरांनी घरी आणायचं ठरवलं. ‘मी त्यांना घरी घेवून येवू का?’ असा प्रश्न मी माझी पत्नी डॉ.सुचेताला फोन करून विचारल्याचं डॉक्टर सांगतात. हाच खरा दोघांच्याही कसोटीचा क्षण! कारण या लोकांना खायला घालण्यासाठी दररोज ६०-७० डबे तयार करण, रस्त्यावरच त्यांच्यावर उपचार करण ठीक होतं. पण, एकदम अशा घाणीने माखलेल्या.. देहधर्माची शुद्ध हरवलेल्या एखाद्या महिलेला घरीच घेवून यायचं म्हणजे अतिच झालं. पण काहीही विचार न करता सुचेता यांनी मात्र लगेच घेऊन या..असं सांगितल. इथूनच खऱ्या अर्थाने 'इंद्रधनू'ची सुरुवात झाली. महामार्गावर, शहरात, गावखेड्यात येथील शहाण्या म्हणवल्या गेलेल्या व्यवस्थेने मनोरुग्ण आणि गंभीर आजारांनी त्रस्त महिला मरण्यासाठी सोडून दिलेल्या असतात. त्या अनन्वित लैंगिक अत्याचाराची शिकार होतात. त्यामधून कधी गर्भवती होतात आणि रस्त्यावरच फिरत राहतात. त्याचं पुढे काय होत? गायीची पवित्रता आणि संगोपन याची काळजी असणारा आपला समाज रस्त्यावर जगणाऱ्या बाईला मात्र माणूसही मानण्यास तयार नसतो. हा विरोधाभास पाहून आपणचं अशा महिलांच्या सेवेसाठी स्वखर्चातून अनाथालय सुरु करण्याचा निर्णय घेतल्याचं डॉ. राजेंद्र सांगतात. 'इंद्रधनू' मुळे त्यांना हक्काच घर मिळालं. महामार्गावर, एखाद्या गावात, शहरात बेवारस, मनोरुग्ण महिला सापडल्या की त्यांना तातडीने तेथून घेऊन यायचं. आल्यावर प्रथम स्वच्छ करायचं. त्यांच्या सर्व वैदकीय तपासण्या, मनोविश्लेषण करून त्यांच्यावर उपचार सुरु करायचे. एखादी महिला रस्त्यावर झालेल्या बलात्कारातून गर्भवती झालेली असते. आपल्या पोटात बाळ आहे ही जाणीवही तिला नसते. तिच्या प्रसूतीपूर्व तपासण्या करायच्या. ती मुळातच उकिरड्यावरच अन्न खाऊन कुपोषित आणि आजारी असते. मग तिची विशेष काळजी धामणे दाम्पत्य घेतात. बाळंतपण पार पाडायचं, तिची काळजी घ्यायची आणि पुढे या मुलांना आपलं नाव देवून त्यांचे पालकत्व स्वीकारायचं. ही मुलं कायदेशीर अडचणीमुळे दत्तक जात नाहीत. त्यांचा सांभाळ आपली मुलं म्हणून करायचा हेही एक महत्वाचं काम. यामुळेच आज 'इंद्रधनू' या नावाबरोबरच 'माऊली' या नावानेही संस्था ओळखली जाते. डॉ. राजेंद्र धामणे व डॉ. सुचेता धामणे संपर्क - ९८ ६० ८४७९५४

पितृपक्ष

माणसांचे लाड,ते जिवंत असेपर्यंतच का नाही करत लोक..? त्यांचा " कावळा "झाल्यावर ..... मग त्यांच्या आवडीचे पदार्थ करून 'पान वाढण्यात', काय अर्थ आहे? !

काहे दिया परदेस रे

काहे दिया परदेस मध्ये सध्या शिव-गौरी च्या प्रेम कहाणी पेक्षा बनारस विरूद्ध मुंबई हाच वाद कमालीचा रंगला आहे. मराठी भाषेची व संस्कृतीची यथेच्छ अवहेलना अगदी सहज राजरोसपणे सुरू आहे. मराठी माणसाचं अतिशय हिडीस आणि अवास्तव चित्रं उभं केलं जात आहे ही अक्षम्य गोष्ट आहे. मराठी संस्कृतीची, राहणीमानाची अवहेलना होत आहे. एका एपिसोड मधे दहीहंडी उत्सवात शिव घायाळ होऊन पडलेला असताना मराठी तरुण मुलं निष्क्रियपणे काहीही मदत न करता उभी होती असे दाखवले. असे दाखवून मराठी माणसाची निष्ठुरताच जणू सिद्ध करायची होती. कथेच्या दृष्टीने हा ड्रामा बसवला होता असे म्हटले तरी एक मात्र गंमत बघायला मिळाली. पहिल्यांदाच 80-85 किलो चा हट्टा कट्टा गोविंदा हंडी फोडताना पाहिला

नाटकाचे बारसे

नाटक’ हा मराठी रसिक प्रेक्षकांचा एक जिव्हाळ्याचा विषय आहे. संगीत असो की व्यावसायिक  अशा प्रत्येक नाट्य प्रकाराला प्रेक्षकांनी कायमच कमी अधिक प्रमाणात भरभरून प्रतिसाद दिला. मात्र लोकप्रिय झालेल्या किंवा नव्याने सुरू झालेल्या काही नाटकांची नावे अचानक बदलण्याचा ट्रेंड बघायला मिळत आहे. राजकीय हस्तक्षेप, काॅपी राईटचा मुद्दा, लोकप्रियतेचे बदलणारे अंदाज किंवा इतर कोणत्याही कारणास्तव हे बदल केले जातात. अर्थात जास्तीत जास्त प्रेक्षकांनी नाट्यगृहात यावे ही या मागची मनोधारणा असली तरी यामुळे प्रेक्षक संभ्रमित व साशंक होण्याची व नाटकाला पर्याय शोधण्याचीच परिस्थिती बर्‍याच वेळा येते.

अजब देव भक्ती

ठाणे जिल्ह्यातून अलीकडेच स्वतंत्र जिल्हा म्हणून उदयास आलेल्या पालघर जिल्ह्यात कुपोषणामुळे 600 पेक्षा अधिक बालमृत्यू झाले. हा आकडा काळीज पिळवटून टाकणारा आहे. संपूर्ण आदिवासी वस्ती असलेला हा जिल्हा असून इथले अनेक तालुके दुर्गम आणि अतिदुर्गम आहेत. वर्षभर हाताला पुरेसे कामच नसल्याने घराघरातील आदिवासी कुटुंबच भुकेने तडफडताहेत. या कुपोषणाला, भूकबळी ला आपण फक्त सरकारला, ह्या ना त्या राजकारणी पक्षाला जबाबदार ठरवून रोज ही संख्या वाढवत ठेवायची की आपल्यातील माणुसकी जागी करून त्या भुकेल्या चिमुकल्यांच्या पोटापर्यंत अन्नाचा कण पोहोचवण्यात खारीचा वाटा उचलायचा हे आपणच सर्वसामान्यांनीच ठरवायला हवे. सरकारी यंत्रणा यावर उपाययोजना करतीलच पण त्यासाठी लागणारा वेळ बालकांची भुक थांबवू शकणार नाही हे वास्तव लक्षात घ्यायला हवे.  एकीकडे लालबागचा राजा, दगडूशेठ गणपती, सिध्दी विनायक, साई संस्थान किंवा इतर कोणतेही देवस्थान असो, जिथे दागदागिने, लाखो करोडो रुपये दान म्हणून दिले जातात, तेच पैसे, तोच दान धर्म आपण डोळसपणे विचार करून समाजाच्या अशा गरजू व्यक्तींना केला तरी देव तेवढाच प्रसन्न होणार आहे किंबहुना त्यापेक्षा जास्तच. स्वत:ला एखाद्या मृत्युमुखी पडलेल्या कुपोषित मुलाच्या बापाच्या जागी ठेवून विचार केला, तर त्यांचे दु:ख, त्यांची हतबलता सर्वाच्याच लक्षात येऊ शकेल.