Feb 27, 2015

मराठी कलाकारांची भाषा

आज सर्वत्र मराठी भाषेपेक्षा इंग्रजीचाच अंमल दिसून येतो आणि म्हणूनच मराठी वाहिन्यांवर ही भाषा जपण्याची जास्त जबाबदारी आहे.

'का रे दुरावा, जुळून येती रेशीमगाठी' या सारख्या अगदी मोजक्या मालिकांचे अपवाद वगळता इतर मालिकांमध्ये शुध्द भाषा आणि स्पष्ट उच्चार याचा लवलेशही दिसून येत नाही. ग्रामीण भागावरील आधारित कार्यक्रमांतर्गत 'आल्ता, गेल्ता' असे उच्चार समजू शकतो परंतु शहरी वातावरण असलेल्या मालिकांमध्ये अशुद्ध मराठी म्हणजे कळस आहे.
उदाहरणार्थ 'कन्यादान' या मालिकेत वारंवार 'मी बोल्ली, तो म्हटला' असे अशुद्ध संवाद आहेत. 'मी म्हणाले, मी सांगीतले, तो म्हणाला, त्याने सांगितले' हे अगदी मुळ मराठी व्याकरणाचे नियम तरी पाळले गेले पाहिजेत.

कलाकारांचे भाषा, संवाद, उच्चार यावर नियंत्रण असणे अत्यंत आवश्यक आहे. मराठी भाषा ही मुळातच खुप प्रगल्भ आणि परिपूर्ण आहे. आपल्याला
समृध्द मराठी साहित्याची परंपरा पूर्वापार लाभली आहे. टिव्ही हे करमणूकीचे माध्यम असले तरी लेखकाने सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून आपल्याला लाभलेल्या या मराठी साहित्याच्या खजिन्याचा अभ्यास करून तो नवीन पिढीपर्यंत तो पोहचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. 

Feb 12, 2015

निर्विकार कलाकार

नमस्कार, नुकतीच गाजावाजा करत झी टीव्ही वर 'कन्यादान' ही मालिका सुरू झाली. इतर अनेक वाहिन्या आणि मालिकांमध्ये चावून चावून चोथा झालेले कथानक आणि निर्विकार चेहर्‍याचे नवोदित आणि अभिनयाचा लवलेशही न येणारे कलाकार बघून आपण ही मालिका का बघतोय असा प्रश्न प्रेक्षकांना पडला. ज्येष्ठ अभिनेते 'शरद पोंक्षे' यांचा अभिनय आणि शीर्षकगीताचे नाविन्यपूर्ण चित्रीकरण हीच या मालिकेची आतापर्यंतची जमेची बाजू आहे.