Nov 28, 2016
वृध्दाश्रम भेट
Great start of last weekend... Visited Smit Old Age Home to meet Naanis and Daadis there. They all too enjoyed playing with my Daughter 'Tejasvi'.
वृध्दाश्रमाला एक धावती भेट. आपुलकीच्या, मायेच्या चार शब्दांसाठी आसुसलेल्या आजीआजोबांना आपण बाकी काही नाही तर निदान आपला थोडासा वेळ तर देऊच शकतो.
आपल्या फक्त काही मिनिटांच्या भेटीमुळे तिथल्या आजीआजोबांचा आख्खा दिवस आणि तुमचं मन आनंदाने भरून जातं.
-
प्रज्ञा
वृध्दाश्रम आणि अनाथाश्रम
म्हातारपण म्हणजे दुसरे बालपण असते असे म्हणतात. खरंतर या दोन्ही वयात आपल्याला जवळच्या, प्रेमाच्या माणसांची खुप गरज असते.
दुर्दैवाने काही जण याच प्रेमाला पारखे होतात. आणि मग आश्रमात आयुष्य जगण्याचा प्रयत्न करतात.
अनाथाश्रम आणि वृध्दाश्रम ह्या दोन्ही गोष्टी आज महत्त्वाच्या सामाजिक गरजा आहेत.
अनाथाश्रमातील लहानग्या चिमुरड्यांना आजीआजोबा, आईबाबांची गरज असते तर वृध्दाश्रमातील वृध्दांना नातवंडांची ओढ.
समाजाची दोन अगदी विरुद्ध, extreme टोकं, एकमेकांची गरज असलेली.
यातील एका टोकावर असलेल्या प्रत्येक पिल्लाला दुसर्या टोकावर आयुष्यात एकाकी राहणार्या आजीआजोबांचा सहवास लाभला तर किती बरं होईल ना.
असं होणं कठीण, खुपच कठीण आहे, कदाचित अशक्य आहे पण झालंच तर "सुखी माणसाचा सदरा" या सगळ्याजणांनाच मिळेल. नाही का?
What Say!
-
प्रज्ञा
Https://majheviewsanireviews.blogspot.in
'झोंबी' चे आनंद यादव यांना भावपूर्ण श्रद्धांजली
काही व्यक्ती गेल्यावर खरोखरच खूप दुःख होते. आपल्या विचारांवर, लेखनावर, विचारशैलीवर बराचसा परिणाम या अवलियांचा असतो.
आज सकाळी लेखक (नटरंगचे जनक) आनंद यादव गेल्याची बातमी वाचली आणि असंच खुप वाईट वाटले.
वाचनाची आवड निर्माण व्हायला कारणीभूत ठरलेली त्यांची पुस्तके डोळ्यासमोर तरळून गेली. त्यांचे लेखन वाचून 'एखादा माणूस इतकं हलाखीचे आयुष्य कसे काय जगतो.' असा विचार कोणाच्याही मनात येईल.
यादवांच्या सर्व पुस्तकांत महत्वाचे ठरले ते त्यांचे 'झोंबी' हे आत्मचरित्रपर पुस्तक.
काॅलेज मध्ये असताना या आत्मचरित्रातील एक लेख अभ्यासक्रमात होता. तो लेख इतका प्रचंड आवडला की संपूर्ण आत्मचरित्र वाचायचा मोह कसा आवरणार! इतकं मनस्वी, काळजाचा ठाव घेणारे पुस्तक एकदा वाचून पोट भरलं नाही. ते पुस्तक परत परत वाचून काढले.
'झोंबी' म्हणजे दारिद्र्याची आणि शिकण्यासाठी केलेली लढाई. या पुस्तकाला पुलंनी प्रस्तावना लिहिली आहे, त्याला त्यांनी समर्पक शीर्षक दिलंय - “झोंबी- एक बाल्य हरवलेलं बालकांड”, बालकांड म्हणजे बालमनावर झालेले आघात! प्रस्तावनेत पु.ल. लिहितात की, "हे आनंद यादवांचं आत्मकथन आहे आणि जर हे असं असेल तर आनंद यादव ह्यांना साष्टांग दंडवतच घालायला हवा. ... "!
हे सगळं आठवलं सकाळी बातमी वाचल्यावर!
ह्या माझ्या आवडत्या लेखकाला भावपूर्ण श्रद्धांजली.......!
-
प्रज्ञा
Nov 25, 2016
#thanksgiving words
Hi all,
Thank you so much all for your valuable time given to read my blog.
its #2000 plus viewers and still many more to go!
#Thanks a lot.
नमस्कार,
सध्या जो #thanksgiving week सुरू आहे त्या निमित्ताने तुम्हाला सगळ्यांना खुप खुप धन्यवाद आणि आभार.
वेळात वेळ काढून तुम्ही वाचलेल्या पोस्ट ची पोचपावती मला वेळोवेळी मिळते.
असाच तुमचा प्रतिसाद मिळत राहो.
धन्यवाद
-
प्रज्ञा
रिझल्ट
आपल्याकडच्या प्रेक्षकांना ना सतत काही ना काही, कोणाची ना कोणाची काळजी असतेच. जान्हवीच्या डिलिव्हरीची काळजी नाही का, आपण जवळपास वर्षभर तरी केली.
आता 'खुलता कळी खुलेना' ही जुलै मध्ये चालू झालेली मालिका ज्या स्पीड ने सुरु आहे ते बघता आयडियली 7 महिन्यांची प्रेग्नंट असलेल्या मोनिकाची डिलिव्हरी व्हायला अजून एखादं वर्ष तरी नक्कीच लागणार.
मालिकेत इतर मातब्बर कलाकार असल्याने त्यांच्यासाठी प्रेक्षक समजून घेतीलच. Options च नाहीत. कारण इतर वाहिन्यांवरही काही फार मोठा उजेड पडला नाही.
..
...
काही असो, पण निदान तो पर्यंत प्रेक्षकांना कपूरांच्या आय मीन खानांच्या करीनाचा रिझल्ट तरी कळेलच.
-
प्रज्ञा
Nov 21, 2016
Nov 20, 2016
गंमत जंमत
थोरातांची कमळा, मोहीत्यांची मंजुळा या नावांच्या धर्तीवर लवकरच नवीन हिंदी चित्रपटाची घोषणा - गुप्त्यांची सोनम!
(ता.क. - फक्त नावातच काय ते साधर्म्य, बाकी का अतापता कुछ नही.)
-
प्रज्ञा
http://majheviewsanireviews.blogspot.in
Nov 19, 2016
#demonetisation
आज नवीन काही लिहीणार नाही. 500-1000 च्या नोटांबद्दलचे बरेच माहितीपर आणि एन्टरटेनिंग (Yes, Very Much Entertaining) मेसेजेस फेसबुक, व्हाॅट्सपवर धडाधड येतायत. ते सगळे वाचायचे आहेत.
-
प्रज्ञा
Nov 18, 2016
विकत घेतले पैसे
#demonetisation
Now Rs 2000 notes are being sold online on e bay.
What a Day! Today People are Buying Money too.
e bay ह्या ऑनलाईन शाॅपींग साईट ने 786 हे अंक असलेल्या 2000 रुपयांच्या नोटा विकायला ठेवल्या आहेत.
अजब दिवस आहेत ना!
सध्या पैसेही विकत घेत आहेत लोक....!
-
प्रज्ञा
Http://majheviewsanireviews.blogspot.in
Nov 17, 2016
#जागतिकखाद्यसंस्कृतीविशेषांक #digitaldiwali2016.com
लहानपणी मला महाराष्ट्राबाहेर जाण्याचा आणि तिथल्या निरनिराळ्या स्थानिक चवींचा आस्वाद घेण्याचा कधीही योग्य आला नाही. पण महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तिथल्या पदार्थांची चव मात्र चाखता आली. अर्थात मुंबईत रहात असल्यामुळे निरनिराळ्या देशी विदेशी पदार्थांची चव जागोजागी असणाऱ्या उपाहारगृह, खाऊगल्ल्यांमध्ये अगदी मनमुराद चाखता आली. या सगळ्यांत गुजराती खाद्यसंस्कृती स्वतःचं विशेष स्थान ठेवून आहे. अगदी रोजच्या खाण्यापासून सणासुदीच्या जेवणापर्यंत आणि नाष्टयापासून जेवणानंतरच्या मुखवासापर्यंत तुम्हाला इतकी विविधता खचितच मिळेल. कदाचित म्हणूनच ‘गुजराती थाळी’ इतकी लोकप्रिय आहे.
गुजरात्यांचा प्रवासातला डबा
लग्नानंतर काही काळ मला गुजरातमधल्या अहमदाबाद शहरात राहण्याचा योग्य आला आणि अस्सल गुजराती खाद्यसंस्कृतीचा आस्वाद मला मनमुराद घेता आला. गुजराती माणूस व्यापारी आणि व्यवहारी असला तरी मूळचा रसिक आणि खवय्या. तुम्ही जगाच्या पाठीवर कुठून कुठेही प्रवास करा, जर तुमचा सहप्रवासी गुजराती असेल तर तो सहसा तुम्हाला खाताना आणि गप्पा मारतांना दिसेल. ही मंडळी घरचे डबे न घेता प्रवास करतांना सहसा दिसणारच नाहीत.
मलाही हा अनुभव माझ्या मुंबई-अहमदाबाद प्रवासात आला. आपल्याकडे प्रवासाला जातांना सहसा आपण पोळी भाजी, दशम्या, धपाटे किंवा ब्रेड वगैरे पदार्थ शिदोरीत घेतो. प्रवासात भूक लागली तर खाण्याचे साहित्य एवढाच त्याचा उद्देश असतो. या उलट गुजराती माणसासाठी प्रवास ही जणू खाण्याची संधीच असते. तुम्ही गुजरातकडे जाणार्या ट्रेन, बसने प्रवास केलात तर गुजराथी बांधवांची पूर्णान्न शिदोरी बघून थक्क होऊन जाल. मलाही नेहमीच गुजराथीसह प्रवाशांचे कौतुकमिश्रीत आश्चर्य वाटले. प्रवासात ठेपले-छुंदा, फुलके-साग, दही भात, ताक, चवाणु म्हणजे गाठीया-फरसाण, फाफडा इत्यादि सर्व वस्तू व्यवस्थितपणे ‘कॅरी’ करून त्याचा हसत खेळत आस्वाद घेणारी ही मंडळी आहेत.
भारतातील प्रत्येक राज्याचे, तेथील खाद्य संस्कृतीचे त्यातील वेगळेपण दर्शवणारे एक वैशिष्ट्य आहे. गुजराती जेवणाचे वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण शाकाहारी आणि कमीत कमी मसाले वापरून शिजवलेले रुचकर व स्वादिष्ट जेवण. या वैशिष्ट्यामुळेच पित्त, कफ, वात यापैकी कोणत्याही शरीर प्रकृतीला मानवणारे आणि तरीही जिभेचे चोचले पुरवणारे हे मिष्टान्न म्हणायला हरकत नाही.
जगाच्या कानाकोपर्यात जिथे जिथे भारतीय वस्ती आहे तिथे तिथे गुजराती जेवण मिळणारे रेस्टॉरंट, फुड जाॅईंट्स सर्वत्र लोकप्रिय झाली आहेत. गुजराथी समाज हा प्रामुख्याने व्यापारधंद्यासाठी ओळखला जातो. वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यापार उद्योगात हा समुदाय जगाच्या पाठीवर जागोजागी प्रस्थापित झाला व आपल्या बरोबर त्यांनी आपली खाद्यसंस्कृतीदेखील नेली. कमी तिखट, सात्विक, संपूर्ण शाकाहारी म्हणजे गुजराती जेवण अशी या जेवणाची साधी सरळ व्याख्या करता येईल.
गुजराती दैनंदिन आहारातील पदार्थ भाजी रोटी, खिचडी, कढी, ढोकला, खांडवी, ठेपला, खाकरा हे आहेत. मोसमाप्रमाणे मिळणार्या पालेभाज्या, फळभाज्या, कडधान्ये, डाळी, कोशिंबीरी या सर्वांचा मुबलक वापर, कमी अगदी गरजेपुरताच तेला-तूपाचा वापर हे प्रमुख वैशिष्ट्य. आणि म्हणूनच कदाचित इतर भाषिक खवय्येही बरेचदा गुजराती जेवणालाच प्राधान्य देतात.
आपल्याकडे महाराष्ट्रात जसे वैदर्भीय, कोकणस्थ, देशस्थ, घाटी, मराठवाडी, खानदेशी, मालवणी अशा जेवणाच्या निरनिराळ्या पध्दती आणि प्रकार आहेत तसेच गुजरातमध्येही प्रामुख्याने उत्तर गुजराती, काठियावाडी, सुरती अशा जेवणाच्या पध्दती आहेत. काठियावाडी खाद्यसंस्कृती ही मुळची राजस्थानची. परंतु गुजराती खाद्यपरंपरेत ती अगदी दुधसाखरेसारखी विरघळून गेली आहे. त्यामुळे गुजरातबद्दल बोलायचे असेल तर ओघाने काठियावाडी जेवणाचाही उल्लेख करायलाच हवा.
गुजराती थाळी
पारंपरिक गुजराती किंवा सुरती थाळीबद्दल बोलायचं झालं तर प्रत्येक भागात तुम्हाला थाळीत जवळपास तेच पदार्थ दिसतील पण चवीत फरक मात्र जाणवेल. तिथल्या स्थानिक मसाल्यांना आणि काही पदार्थांनाही गुजराती थाळीत स्थान मिळालेलं पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल.
मुळात गुजराती थाळी इतकी भरगच्च असते की, जेवणापूर्वीच तुमचं मन तृप्त होऊन जातं. एकाच थाळीत रोटी, भाज्या, भात, फरसाण, गोड पदार्थ, चटण्या, लोणची, सॅलड, ताक ह्यांसारख्या अनेक पदार्थांची रेलचेल असते. गुजराती थाळीचेच स्टार्टर्स म्हणता येईल असे पदार्थ म्हणजे खांडवी, मसाला पुरी, मुगाची भजी, ढोकळा, दालवडा, आणि मटार व भाज्यांचं सारण भरलेली करंजी (जिला गुगरा असं म्हणतात). हया सर्व खाद्य पदार्थांना या ताटात अढळ स्थान असते.
त्यानंतर मुख्य जेवणात गव्हाची पोळी, बाजरीची भाकरी (किंवा) आणि ठेपला अशा तीन प्रकारच्या रोटी वा भाक-या असतात. त्याच्या जोडीला तीन भाज्या, यात एक हिरवी पालेभाजी, एक फळभाजी आणि एक उसळ भाजी. मग साधा भात, खिचडी आणि पुलाव असे भाताचे प्रकार, याशिवाय वेगवेगळ्या प्रकारच्या आणि रंगांच्या गोड, तिखट, आंबट चटण्या, ताक असा सारा सरंजाम असतो.
एवढं सगळं खाऊन झाल्यावर गोड हवं असेल, तर या थाळीत दोन प्रकारचे गोड पदार्थ असतात. यात एक मिठाई दुधाची, दुसरी शुद्ध तुपातली असते. इकडची लोकप्रिय मिठाई म्हणजे इमरती आणि राजभोग.
थाळीवर यथेच्छ ताव मारल्यानंतर मीठा पान खाण्याची मजा काही औरच.
काठियावाडी
गुजराती जेवण गोडसर असतं. पण काठियावाडी जेवणाचं वैशिष्ट्य म्हणजे ते तिखट, मसालेदार, झणझणीत असतं. या थाळीत बेसन घालून केलेली मेथीची भाजी किंवा दुधी मुठीया, भरपूर लसूण घालून केलेलं वांग्याचं भरीत, ‘सेव टमाटर’ म्हणजे टोमॅटोच्या रशात भावनगरीसारखी शेव टाकून केलेली चटकदार भाजी हमखास असतेच. ही पातळ भाजी चपाती किंवा रोटलो म्हणजे भाकरी, कशाबरोबरही खाल्ली तरी मस्त लागते.
पंजाबी प्रकारच्या त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर या काठियावाडी भाज्यांची चव चाखायलाच हवी.
भाकरी (रोटलो)चे तर इथे ज्वारी, बाजरी, तांदूळ, नाचणी आणि मिश्र धान्य असे अनेक प्रकार असतात. लसणिया रोटलो असाही एक प्रकार आहे. बाजरीच्या पिठात लसूण मिसळून केलेली ही भाकरी लसूणप्रेमींना आवडेल अशी आहे. भाकरीचा आणखी एक नवा प्रकार म्हणजे फ्राय रोटलो. भाकरीचे तुकडे ग्रेव्हीत टाकून त्याला फोडणी देऊन बनवला जाणारा हा प्रकार आवर्जून चाखावा असा आहे.
याच पद्धतीने बनवलेली फ्राय खिचडीही अप्रतिम! भरपूर तेलात जिरेमोहरीची फोडणी करून त्यात लसूण खरपूस भाजून त्यावर बटाटा, कांदा, टोमॅटो, सिमला मिरची, कोथिंबीर, हिरवी मिरची, आले आणि मोसमाप्रमाणे मिळणार्या मटार, गाजर, घेवडा, फ्लॉवर, पातीचा कांदा हे सर्व तेल सुटेपर्यंत छान परतून घेतले जाते. मग त्यात समप्रमाणात स्वच्छ धुतलेले तांदूळ आणि तुरडाळ व मसुरडाळीचे मिश्रण घातले जाते. ही खिचडी मंद आचेवर शिजवली जाते. कुकरच्या दोन शिट्या की तीन शिट्या हे मोजमाप इकडे मुळीच उपयोगाचे नाही. अगदी माजघरापर्यंत खमंग सुवास दरवळेस्तोवर ही खिचडी शिजवली जाते. ही फ्राय खिचडी तिथल्याच लोकप्रिय खिचीया पापड आणि छुंद्याबरोबर सर्व्ह केली जाते.
खिचीया पापड
खिचीया पापड हा देखील एक एकदम चविष्ट खाद्य प्रकार. उकडीच्या तांदळाचा भला मोठा पापड भाजून त्याचे मोठे तुकडे करुन त्यावर उकडलेला बटाटा, टोमॅटो, काकडी, मग हिरवी चटणी आणि लाल चटणी पसरवून त्यावर भरपूर कोथिंबीर घालायची आणि त्याही वर मग पिवळीधम्मक बारीक शेव व डाळ. अहाहा! नुसतं वर्णन ऐकूनच जर तोंडाला पाणी सुटलं असेल तर चव घेऊन पाहायलाच हवी. मुंबईत काळबादेवी, माटुंगा या भागातील खाऊ गल्लीत खिचीया पापडचा आस्वाद घेता येईल.
चूरमा लाडू आणि पुरणपोळी ह्या पदार्थांनाही काठियावाडी थाळीत महत्वाचं स्थान आहे. गव्हाच्या जाडसर पिठात तूप-गूळ टाकून केलेला चुरमा लाडूही जेवणाचा शेवट गोड करणारा असतो. आपल्याकडे पुरणपोळीत चणाडाळीचं पुरण केलं जातं, तर काठियावाडीत पुरणासाठी तुरीची डाळ वापरली जाते. तसंच बाहेरचं आवरण मैद्याचं न करता गव्हाच्या कणकेचं केलं जातं. भरपूर तूप आणि पुरणाने गच्च भरलेली ही गरमागरम पोळी नुसती समोर जरी आली तरी क्षुधाशांतीआधीच नजरेचे पारणे फिटतं.
छुंदा
छुंदा हा लोणच्याचा प्रकार तुम्हाला घरीही करता येईल. कैरीचा कीस आणि साखर एका कढईत घेऊन छान एकत्र करायचं व हे मिश्रण गॅसवर ठेवायचं. इथे कैरीच्या आंबटपणावर साखरेचं प्रमाण ठरतं. गॅस मध्यम आचेवर ठेऊन मिश्रण ढवळत रहायचं. त्यात दालचिनी,वेलदोड्याचे दाणे, जिरे यांची बारीक पूड, तिखट,मीठ, लाल सुक्या मिरच्यांचे तुकडे घालायचे आणि छान ढवळायचे की झाला छुंदा तयार!
मकर संक्रांत आणि उंधियो
पौष महिन्यातील मकर संक्रांत हा गुजराथी बांधवांचा महत्वाचा आणि जिव्हाळ्याचा सण! या सणाला उत्तरायण किंवा पतंगउत्सव असंही म्हटलं जातं. या सुमारास वसंत ऋतुचे आगमन झालेलं असतं. नव्याने पेरणी झालेली वेगवेगळी पिकं आता कापणीसाठी तयार असतात. आणि हिरव्यागार शेतात सर्वत्र सुजल सुफल असं दृश्य दिसतं. हाच आनंदोत्सव गुजरातवासी रंगीबेरंगी पतंग आकाशात उडवून साजरा करतात. ‘कायपोचे’ ह्या हिंदी चित्रपटातील तीन मित्रांच्या कहाणीत याच सणाची पार्श्वभूमी घेण्यात आली होती.
वैविध्यपूर्ण रंगाचे पतंग विविधतेत एकता, आनंद, उत्साह आणि परस्पर स्नेह-सौहार्द याचं प्रतीक मानले जातात. या सणाच्या निमित्ताने घरोघरी केला जाणारा उंधियो हा पदार्थ म्हणजे अगदी जीव की प्राण असं म्हटलं तर ती मुळीच अतिशयोक्ती नाही. उंधियो हा झटपट शिजणारा पदार्थ नव्हे. आरोग्यास उत्तम अशा पौष्टिक आणि चविष्ट भाज्यांचा समावेश यात केला जातो. थोडासा क्लिष्ट वाटणारा आणि भरपूर तेलातुपात शिजायला निवांत वेळ घेणारा, असा हा पदार्थ आहे. परंतु वर्षातून एकदा येणाऱ्या मकर संक्रांतीच्या दिवशी पानात हक्काचं स्थान असणारा उंधियो न कंटाळता आणि अगदी प्रेमाने रांधला वाढला जातो.
सढळ हाताने मोजमाप न करता तेल पातेल्यात घालून त्यात प्रथम ओवा, हिंग व हळद घालून तुरीचे दाणे, वालाचे दाणे, सुरती पापडी हे फोडणीला घालावं. वाफ काढून मध्यम शिजल्यावर, बटाटे, छोटी वांगी, कच्ची केळी, रताळी, कंद सगळ्या भाज्या घालाव्या, मग मिक्सरमध्ये आले, लसुण, मिरची, खोबरे, कोथिंबीर जाडसर वाटून त्यात घालावं. हे सर्व थोडं परतून मग त्यावर हळद, तिखट, मीठ, साखर, धणेजिरे पूड आणि लिंबू पिळून भाज्या शिजण्यासाठी थोडंसंच पाणी घातलं जातं. खरं म्हणजे उंधियोमध्ये अजिबात पाणी घालत नाहीत, फक्त तेलात शिजवतात.
हा पदार्थ अधिक रुचकर करण्यासाठी भाज्या शिजल्यावर त्यात तळलेले मुठिये घातले जातात. मुठिये म्हणजे बारीक चिरलेल्या मेथीत, बेसन, तिखट, मीठ, हळद, धणेजिरे पूड, आले, मिरची व थोडे तेल हे सारे एकत्र करून थोडे थोडे पाणी घालून घट्ट भिजवून, छोटे छोटे गोळे करून कुरकुरीत होईपर्यंत तळले जातात. याला मुठिया म्हणतात. मग हे मुठिये घालून परत थोडे पाणी घालून भाजी शिजवावी म्हणजे मुठिये थोडे मऊ होतात. बस!! असा हा रुचकर उंधियो तय्यार.
नवरात्र आणि जिलेबी-फाफडा
आपल्याकडची म्हणजे महाराष्ट्रातील लावणी जसा पारंपारिक नृत्यप्रकार तसाच गुजराथी बांधवांचा गरबा! जागोजागी, घरोघरी नऊ रात्री नऊ दिवस अंबामातेची आराधना केली जाते आणि सगळा आसमंत भक्तीमय होतो. गरबा किंवा दांडिया रास ही परंपरा जिव्हाळ्याची असण्याचं कारणही तसेच! गुजरातमध्ये आजही बर्याच घरात एकत्र कुटुंबपद्धती आहे. मोठमोठी घरं आणि नातेवाईकही बरेच! लग्नाआधी मुलींचे कितीही लाड केले, हट्ट पुरवले तरी लग्नानंतर आजही डोक्यावर घुंगट ही संकल्पना अस्तित्वात आहे. त्यामुळे या व्यस्त आणि जबाबदारीच्या आयुष्यातून घरच्या लेकीसुनांना चार घटका मनसोक्तपणे सणाचा आस्वाद घेता यावा. सख्यांबरोबर मन रमवता यावं म्हणूनच नवरात्र आणि ओघाने गरबा साजरा करण्याची संकल्पना अस्तित्वात आली.
दसऱ्याच्या दिवशी गुजरातमध्ये जिलेबी फाफडा खाण्याची पद्धत आहे. गोड गरमागरम जलेबी आणि पपईच्या चटणी बरोबर वाढलेला फाफडा ही एक चविष्ट जोडी आहे. नवमीला गरबा संपल्यानंतर खवय्यांनी रस्त्यावर, गल्लोगल्ली जिलेबी फाफडा घेण्यासाठी रांगा लावलेल्या पाहायला मिळतात.
अशा या विविधरंगी खाद्यसंस्कृतीचा आस्वाद घ्यायला एकदा तरी गुजरातला भेट द्यायलाच हवी.
काही पाककृती
गुजराती कढी
साहित्य
२ वाट्या ताक, मिरच्या चवीप्रमाणे, आल्याचा लहान तुकडा, १ टेबलस्पून डाळीचे पीठ (बेसन), मीठ, थोडासा गूळ, २ लवंगा, दालचिनीचा तुकडा, १/२ चमचा मोहरी
कृती
मिरच्या, आले, मोहरी, लवंग, दालचिनी हे पदार्थ वाटून घ्यावेत व ताकात घालावेत. डाळीचे पीठ थोड्या पाण्यात कालवून घ्यावे व ताकात घालावे. गूळ व मीठ घालून कढीला उकळी आणावी. थोडा कढीपत्ता व कोथिंबीर टाकावी. नंतर हिंग, जिरे व ५-६ छोट्या लाल मिरच्या घालून तुपाची ( तेलाची नव्हे ) फोडणी द्यावी. ही कढी थोडी दाटच असते. हळद अजिबात घालू नका.
डाळ वडे
साहित्य
१ वाटी तूर डाळ, १ वाटी हरभर्याची डाळ, १ वाटी उडदाची डाळ, १/२ वाटी मसुराची डाळ, मीठ, २ कांदे बारीक चिरून, आले लसूण पेस्ट चवीप्रमाणे, हळद, मीठ, तळण्यासाठी तेल, हिंग
कृती
सर्व डाळी एकत्र रात्री भिजत घालाव्यात. सकाळी बारीक वाटून घ्याव्यात. नंतर त्यात मीठ, हिरव्या मिरच्यांचे तुकडे, आले लसुण पेस्ट, हिंग-हळद घालून चांगले कालवावे. बारीक चिरलेला कांदा घालून, लहान-लहान वडे तळून काढावेत.
गुजराती पात्रा
साहित्य
अळूची पाने, बेसन, तिखट, हळद, मीठ, ओवा, तीळ, तळण्यासाठी तेल
कृती
प्रथम अळूची पानं धुऊन घ्या. बेसन भिजवताना त्यात हळद, तिखट, चवीपुरते मीठ, ओवा, तीळ व तेलाचे मोहन घालून घटृ भिजवा. ते मिश्रण अळूच्या पानाला लावून रोल तयार करा काही वेळ ते वाळू द्या. नंतर त्याच्या गोल चकत्या कापा व मंद आचेवर तळा.
प्रज्ञा पंडित
#खवय्येगिरी
#500-1000 चा विषय बदल म्हणून जरा न्यूज चॅनल सोडून इतर चॅनेल सर्फिंग केले. एका प्रतिथयश मराठी चॅनल वर एक अति लोकप्रिय रेसिपी शो सुरू होता. त्यात एका रेसिपी मध्ये ब्रेड स्लाईसवर केळ्याचे काप, स्ट्रॉबेरी (?) आणि बरंच काही ठेवून banana sandwich दाखवले. त्यांचे म्हणणे हा लहान मुलांसाठी पौष्टिक खाऊ आहे जो तुम्ही टिफीन मध्ये ही देऊ शकता. (विचार करा तुम्ही केळी-पाव डब्यात भरून दिले आहेत आणि 2-3 तासाने रिसेस मध्ये तुमच्या लेकराने डबा उघडल्यावर तो डबा किती आणि कसा दरवळेल!!).
दुसर्या रेसिपी मध्ये मसाला लावुन तळलेली वांग्याची कापे साखरेच्या पाकात (o my god)घोळवून साईड ला डेकोरेशन म्हणून ऑलिव्ह आणि ब्रोकोली नामक भाज्या परतून ठेवून सर्व्ह केली गेली. घरी पाहुणे आल्यावर म्हणे एक नवीन पदार्थ म्हणून ही डिश तुम्ही बनवू शकता. ( hmm )
पाहुणे आल्यावर बनवा वगैरे ठिके, म्हणजे आम्ही बनवू देखील, पण ते खाल्यानंतर ते पाहुणे परत येतील की नाही याची गॅरंटी काय?
What Say!
-
प्रज्ञा
https://majheviewsanireviews.blogspot.in
Nov 16, 2016
500-1000 #demonetisation #blackmoney
Defination of Sense of Humour किंवा किमान विनोद बुद्धीची परिभाषा नक्की काय आहे हो?
नोटा चलनातुन बाद झाल्या आहेत पण त्या नोटाच आहेत ना?
पैसेच आहेत ते! काही दिवसांपुर्वी धन,लक्ष्मी म्हणून पुजले होते ना ते पैसे??
सध्या विनोदाचा भाग म्हणून सोशल मिडीयावर व्हायरल झालेल्या त्या पुजलेल्या नोटांचा आता पायपुसणे, ओटा पुसणे असा वारंवार आक्षेपार्ह उल्लेख झालेले विनोद वाचले. असे टुकार विनोद लिहीणारया विनोदवीरांच्या So Called विनोदबुद्धीची कीव करावीशी वाटतेय मला.
I am Speechless!
-
प्रज्ञा
http://majheviewsanireviews.blogspot.in
Nov 12, 2016
#काहेदियापरदेस #zeemarathi #kahediyapardes #blackmoney
अगंssssssबाई,
निशावहिनीने सासऱ्यांची फसवणूक करून विकलेल्या घराचे मिळालेले 70 लाख उशीत लपवले आहेत. आणि ते तर जुन्या 500-1000 च्याच नोटांचे आहेत.
म ssss ग ?? आता??
सिरियलचा ट्रॅक #blackmoney दाखवण्यासाठी 'वक्त की मजबुरी' की 'वक्त के चलते' की काय म्हणतात तसं बदलणार ना?
#काहेदियापरदेस #kahediyapardes #zeemarathi
-
प्रज्ञा
Http://majheviewsanireviews.blogspot.in
Nov 11, 2016
#blackmoney हटाव मोहीम आणि support of #Bank
तुफान गर्दी, ताणतणाव, चिडलेल्या, घाबरलेल्या ग्राहकांच्या लांबच लांब रांगा.
याही परिस्थितीत काळजीपूर्वक, अतिशय जबाबदारीचे काम.
जे करताना थोडीशी जरी चूक झाली की स्वतःच्याच अकाउंट मधुन पैसे वजा होण्याची भीती.
अशा परिस्थितीत सतत, तासन तास, तेच तेच आणि तसेच काम करायचे तेही अचानक हक्काच्या सगळ्या सुट्ट्या रद्द करून !
प्रत्येक ठिकाणच्या बँके समोरच्या लांबच लांब रांगा बँकेच्या शाखेत बसलेला तोच तेवढाच 10-20 जणांचा स्टाफ नेटाने हँडल करत आहे.
शेवटी बँक कर्मचारी सुद्धा माणसंच आहेत.
मान्य आहे की बँकेच्या स्टाफला नेहमी खासगी क्षेत्रा पेक्षा जास्त रजा मिळतात. इतर क्षेत्रात काम करणार्या 100 % जनतेच्या मनात हा छुपा राग कणभर तरी असतोच. पण तरी, तो राग सध्याच्या घडीला विसरा आणि समजून घ्या की बँक कर्मचारी आत्ता करत असलेले काम म्हणजेही देशसेवाच आहे.
What Say?
पटलं असेल तर जरूर शेअर करा.
-
प्रज्ञा
Nov 9, 2016
#500-1000 आणि उरलेला फराळ
आता करायचेच आहेत म्हटल्यावर करुच ना 500-1000 रुपये बॅकेत जमा.
करुया, त्यात काय एवढे!
पण ते जरा दिवाळीच्या फराळातील उरलेले
लाडु, शंकरपाळी, अनारसे पण 500-1000 बरोबर बॅकेत जमा करावेत असे फर्मान पण काढले असते तर बरं झालं असतं नाही?
Whay Say!
-
प्रज्ञा
Http://majheviewsanireviews.blogspot.in
Nov 8, 2016
500-1000 #demonetisation #blackmoney
आज नवीन काही लिहीणार नाही. 500-1000 च्या नोटांबद्दलचे बरेच माहितीपर आणि एन्टरटेनिंग (Yes, Very Much Entertaining) मेसेजेस फेसबुक, व्हाॅट्सपवर धडाधड येतायत. ते सगळे वाचायचे आहेत.
-
प्रज्ञा
Nov 7, 2016
माझे मत
स्वतः वर काॅन्फीडन्स असणे कधीही चांगले.
परंतु काॅन्फीडन्स आणि ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये खुपच नाजुक सीमारेषा आहे. ती ओळखायला हवी ज्याची त्याने. ती रेषा ओलांडली की मग ती ओव्हर कॉन्फिडन्ट व्यक्ती आसपास असणेही नकोसे वाटते.
त्याच्या पुढची स्टेप म्हणजे अॅरोगन्स.
तो तर अगदीच नकोसा. अॅरोगन्ट लोकांच्या संगतीत राहणे म्हणजे इतरांना एक प्रकारची काळ्या पाण्याची शिक्षा आहे. तुम्ही कसेही, कितीही चांगले वागा त्यांना तुमच्या प्रत्येक वागण्यात चुक दिसते, खोट दिसते.
"आपण चांगले वागलो तर समोरचा चांगले वागेल" या टाईपच्या म्हणी, सुविचार वगैरे या अॅरोगन्ट आणि ओव्हर कॉन्फिडन्ट लोकांना अज्जिब्बात लागु होत नाहीत.
भगवान बचाए ऐसे लोगोंसे!
What Say!
-
प्रज्ञा
#व्हेंटिलेटर #प्रियांकाचोप्रा
#प्रियांकाचोप्राने #व्हेंटिलेटर चित्रपटात बाबांसाठी गायलेले गाणे खुप लोकप्रिय होतेय. फेसबुक, ट्विटर सर्वत्र या गाण्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. या आधीही सलील कुलकर्णींचे 'दमलेल्या बाबांची कहाणी' ऐकुन कित्येकांचे काळीज पिळवटले. मलाही पर्सनली ही गाणी खुप आवडली. त्यातील भावना शब्दांत अलगद आणि अचूक गुंफली आहे.
पण मला एकच प्रश्न पडलाय....
की प्रियांकाच्या ऐवजी हेच गाणे जर अन्नु मलिक किंवा बाबा सहगल किंवा अगदीच अनुप जलोटांनी किंवा इतर कोणत्याही लोकप्रिय गायकांनी गायले असते तरी एवढेच हिट झाले असते का?
What Say!
-
प्रज्ञा
Nov 6, 2016
खवय्ये गिरी
जगात कितीही मतभेद असले तरी
एका बाबतीत मात्र कोणाचेच दुमत होणार नाही की...
जेवढी मज्जा प्लेटवर प्लेट, प्लेटवर प्लेट पाणीपुरी, शेवपुरी खाताना येते त्यापेक्षा जास्त मज्जा नंतर मिळणार्या मसाला पुरी खाताना येते.
-
प्रज्ञा
Http:// majheviewsanireviews.blogspot.in
Nov 5, 2016
जुन्या मालिका
धुम, हेराफेरी, वेलकम या सुपरहिट हिंदी चित्रपटांचे सिक्वेल येऊन गेले. येत्या काही दिवसांत राॅकस्टार, फोर्स हे चित्रपटही आपापले पार्ट 2 घेऊन येतायत. आधीच्या पुण्याईच्या बळावर (कसेही असले तरी) हे सिक्वेल देखील हिट होतील.
असो!
मुद्दा हा आहे की चित्रपटांप्रमाणेच मालिकांचेही सिक्वेल आले तर किती बरं होईल! म्हणजे बघा, ऑफिस ऑफिस, ये जो है जिंदगी, देख भाई देख, जबान संभालके, श्रीमान श्रीमती, मराठी मध्ये गोट्या, संस्कार आणि अशा खूप छान छान मालिका....!
या मालिकांचेही सिक्वेल आले तर सध्याचा दूरदर्शन जरा तरी बघणीय म्हणजेच दर्शनीय होईल.
What Say!
-
प्रज्ञा
Http://majheviewsanireviews.blogspot.in
Nov 4, 2016
#Selfesteem #Selfrespect अधिकार आणि कर्तव्य
अनाठायी, उगीचच, जातायेता हक्क आणि अधिकार गाजवणारी मंडळी नेहमीच प्रत्येकाच्या अवतीभवती असतात. काही ना काही कारणास्तव आपण त्यांना ते हक्क गाजवूही देतो. पण योग्य वेळी - Somewhere Down The Line - त्या मंडळींना ही समज द्यायला हवी की हक्क आणि अधिकार इज इक्वल टू ऑर लेस दॅन
( = किंवा < ) कर्तव्य आणि जबाबदारी.
कर्तव्य आणि जबाबदारी पार पाडत असाल तर हक्क आणि अधिकार ओघाने येतीलच तुमच्याकडे.
पण तसं जर होत नसेल तर 'Stay in Your Limits' असे ठणकावून सांगण्याची सवय अंगात भिनवायला हवी.
Learn #Selfrespect #Selfesteem
-
प्रज्ञा
Http://majheviewsanireviews.blogspot.in
Nov 2, 2016
मालिका आणि महिला
प्रत्येक वाहिनीवरील जवळजवळ सर्वच मालिका स्त्री प्रधान असल्या तरी त्यात आजच्या काळातील स्त्रीचे वास्तवदर्शी चित्र फार कमी प्रमाणात दाखवले जाते. त्यातील स्त्री अगदी सौजन्याचा कळस तरी असते किंवा खलनायिका तरी असते!
दर्शक महिलावर्ग या मालिका पाहताना त्यातील व्यक्तिरेखांशी स्वतःला रिलेट करतात. त्यात दाखवल्या जाणार्या परिस्थितीची त्या आपल्या घरात सांगड घालतात. परंतू मालिकांमधले विचार घरात रुजवताना वास्तव मात्र निराळे असल्यामुळे घरगुती नात्यांमधे दुरावा निर्माण होतो.
माझ्या लहानपणी आठवणीतील
मालिकांमध्ये एक होती ‘उडान’, आणि दुसरी होती ‘रजनी.’ या मालिकांमधील व्यक्तीरेखांचा प्रभाव इतका होता की, तेव्हा प्रत्येक मुलीला ‘उडान’मधली हुशार व कर्तृत्ववान
कविता आणि 'रजनी'सारखं खंबीर आणि सडेतोड व्हायचं होतं . त्यानंतर आलेल्या सांस बहू मालिकांमध्येसुद्धा अनेकींना अन्यायाच्या विरोधात आवाज उठवणार्या
तुलसी किंवा पार्वती व्हायचं होतं.
आजच्या घडीला समाजातील वाईट चालीरीती व दुष्ट प्रवृत्तीला तोंड देण्यासाठी गरज आहे स्त्रीला शारीरिक व मानसिक रित्या सशक्त व धीट बनवण्याची!
टीव्ही हे आजच्या काळातील प्रभावी माध्यम आहे आणि म्हणूनच टिव्हीची जबाबदारीही मोठी! चांगली किंवा वाईट अशा व्यक्तीरेखा रंगवण्यापेक्षा आजच्या काळात गरज आहे ती खंबीर, सशक्त, सारासार विचार करणारी,
सदसद्विवेक बुद्धीची व न्यायासाठी झगडणारी परंतु त्याचबरोबर आपल्या घराचे घरपण आणि नाती जपणाऱ्या नायिकेची!
Nov 1, 2016
#aedilhaimushkil #एदिलहैमुष्कील
आयुष्यात कधी ना कधी असा दिवस येतोच की त्या वेळी आपल्याला काहीच काम नसते.
खुपच कंटाळवाणा असा एखादा दिवस येतो.
अशा वेळी #एदिलहैमुष्कील नावाचा चित्रपट बघा. मग तुम्ही अजुन कंटाळाल!
आधीच कंटाळलेले असल्यामुळे तुम्हाला मग फार फरक पडणार नाही.
सारांश - म्हणजे Bottom Line- काय आहे तर...
Yefilmhaimushkil साॅरी साॅरी
#aedilhaimushkil बघितला न बघितला
का ssssssss ही बिघडणार नाही.
-
प्रज्ञा
मुलींची सुरक्षितता
मुंबईतील एका नामांकित शाळेतील अल्पवयीन विद्यार्थीनीवर विनयभंग केल्याची बातमी अतिशय धक्कादायक आहे. दिवसेंदिवस वाढतच जाणार्या या विकृत घटना मन विषण्ण करणार्या आहेत. शाळेसारखे पवित्र विद्यास्थानही मुलींसाठी सुरक्षित नाही हे एक भयाण वास्तव समोर आले. या गुन्हेगारांवर तत्परतेने
कायदेशीर कारवाई करण्यात यावी. तसेच
याबाबत नुकत्याच हायकोर्टाने दिलेल्या सूचनेप्रमाणे लवकरात लवकर खाजगी व सरकारी सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावे आणि शाळेच्या परिसरात
सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात यावी. शाळेतील शिस्त व
सुरक्षेसंबंधी नियमावली अधिक कडक करून शाळासंबंधित अधिकारी व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांवर बंधनकारक करण्यात यावी.
Subscribe to:
Posts (Atom)