Jun 14, 2016
मुलगीच हवी हो
केंद्रीय दत्तविधान संस्थेकडून ( कारा ) आलेल्या अहवालानुसार देशात मुलांच्या तुलनेत ३६ टक्के मुलींना दत्तक घेण्याचे प्रमाण वाढले असल्याची माहिती नुकतीच
समोर आली. त्यातही आशादायी चित्र म्हणजे
नैसर्गिकरीत्या पहिले अपत्य असेल तरीही दुसरी मुलगी दत्तक घेण्याचे प्रमाण गेल्या दोन वर्षांत दहा टक्क्यांनी वाढले आहे.
इच्छुक दांपत्य पालक तसेच 'सिंगल मदर्स' देखील 'मुलगीच दत्तक हवी', म्हणून वेटिंग लिस्टवर थांबण्याची तयारी दर्शवत आहेत.
मुलींचे कमी होत जाणारे प्रमाण, समाजात वाढणारी असुरक्षितता व अस्थैर्य यामुळे
अनाथ मुलींचे पालनपोषण व त्यांचा नैतिक आणि सामाजिक अधिकार त्याच बरोबर त्यांना गरजेचा असलेला भावनिक आधार हे ज्वलंत प्रश्न समाजापुढे उभे ठाकले आहेत.
या पार्श्वभूमीवर हा निश्चितच स्वागतार्ह आणि विधायक सामाजिक बदल म्हणायला हरकत नाही.
दुष्काळातील दहावे...
महाराष्ट्रातील दुष्काळ परिस्थिती आणि उद्भवलेली भीषण पाणीटंचाईची समस्या आज सर्व स्तरीय चिंतेचा विषय आहे.
लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी देखील करावी लागणारी वणवण, कर्जबाजारी झाल्यामुळे प्रचंड संख्येने आत्महत्या करणारे शेतकरी, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबाची होणारी अतोनात वाताहत यासारख्या गंभीर समस्यांना सामोरे जावे लागत आहेच परंतु मन सुन्न करणारे वास्तव म्हणजे मृत्यूपश्चात अस्थी विसर्जनासाठीही लोकांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. अहमदनगर जिल्ह्य़ातील 'कोल्हार' गावची सध्याची ही परिस्थिती अंगावर काटा उभा करणारी आहे.
'दशक्रिया विधीसाठी पाण्याचे टँकर उपलब्ध'
अशा प्रकारच्या जाहिरातींचे फलक पाहून आज मृत्यूनंतरही व्यक्तीचे पाण्यासाठी हाल होत आहेत हेच भीषण वास्तव दिसून येते.
द कपिल चा कार्यक्रम
सोनी टिव्हीवर बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित असलेला 'द कपिल शर्मा शो' एकदाचा सुरू झाला. 'काॅमेडी नाईट्स विथ कपिल'चेच सर्व कलाकार आणि त्यांच्या नविन व्यक्तीरेखा हा एक या कार्यक्रमातील नाविन्यपूर्ण भाग! बाकी हिंदी चित्रपट/मालिकांचे प्रमोशन कपिलचे 'इन्स्टंट' जोक्स आधीच्या कार्यक्रमाप्रमाणेच असल्यामुळे 'शो'ची रूपरेषा जवळपास सारखीच आहे.
सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जाहीर करण्यात आल्याप्रमाणे या कार्यक्रमाचे प्रक्षेपण
फक्त 26 भागांसाठी करण्यात येणार आहे.
त्यामुळे कार्यक्रमात पाणी घालून तो रबरासारखा न ताणता वेळीच आवरता घेतला जाईल आणि कार्यक्रमाची गुणवत्ता व नाविन्य शेवटपर्यंत राखले जाईल ही रास्त अपेक्षा करायला हरकत नाही.
नाटकाविषयी महत्वाचे. ...
नाटक’ हा मराठी साहित्याचा व अनुषंगाने रसिक प्रेक्षकांचा एक जिव्हाळ्याचा विषय आहे. संगीत, प्रायोगिक, व्यावसायिक, समांतर अशा प्रत्येक नाट्य प्रकाराला प्रेक्षकांनी कायमच भरभरून प्रतिसाद दिला.
मात्र गेल्या काही वर्षांपासून अचानक कोणतीही कल्पना न देता यशाच्या शिखरावर असलेली नाटके बंद होण्याचे
प्रमाण वाढत आहे.
वादग्रस्त विषय, कलाकारांमधील मतभेद, आवडत्या कलाकारांची रिप्लेसमेंट या व अशा काही कारणांमुळे नाटकाच्या प्रयोगांना उतरती कळा लागत असली तरी कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक नाटकांचे प्रयोग रद्द किंवा बंद करण्यात येतात. यामुळे प्रेक्षक संभ्रमित होतात.
चांगली नाटके रंगभूमीवर येणे ही काळाची गरज आहे. तरच 'इडियट बाॅक्स'च्या जमान्यात रंगभूमी तग धरू शकेल.
पाऊस, मी आणि. ...आई
अगदी लहान असताना, शाळा सुटल्यावर आई घ्यायला यायची! शाळेत (कसेबसे) 5 तास आई शिवाय काढल्या नंतर आईला बघितल्यावर जो आनंद व्हायचा तोच आनंद आज खुप वाट बघितल्यावर आलेल्या पावसाला बघून होतोय.
फेसबुक वरचा देव बाप्पा
फेसबुक वरील देवी देवतांचे फोटो लाईक केल्याने देव कसा प्रसन्न होईल आणि कशी काय चांगली बातमी मिळेल किंवा आजारी व्यक्तींच्या फोटोवर 'आमीन' असे टाईप केल्यावर ती व्यक्ती कशी बरे ठणठणीत होईल हे मला न उलगडलेले कोडे आहे. देवाचे तर फेसबुक अकाउंट नाही त्यामुळे देवाला #टॅगही करू शकत नाही जेणेकरून देवाला कळेल ! ? !
ह्या प्रकारांनी झालाच तर त्या त्या पेज अॅडमिनला आणि पर्यायाने झुकरबर्गभाऊलाच फायदा होईल.
Jun 13, 2016
इकडून तिकडे
पाकिस्तानातून 'चुकून' भारतीय हद्दीत आलेल्या ३ मुलांवर कोणतीही कारवाई न करता भारतीय लष्कराने व सीमा सुरक्षा दलाने त्यांना परत मायदेशी पाठवले व परत जाताना त्यांना मिठाई आणि भेट वस्तूही दिल्या.
ही बातमी वाचून मला 'तारक मेहता...'मध्ये चुकुन पाकिस्तानी हद्दीत गेल्यावर 'जेठालाल'ने ओढवलेल्या संकटांशी केलेला सामना आणि 'बजरंगी भाईजान' मधील अशीच चुकुन भारतात आलेल्या चिमुरडीची कैफियत आठवली. अर्थात करमणूकीच्या या माध्यमातील कथा काल्पनिक असल्या तरी परिणामकारकही असतात.
त्यामुळे ही सत्य परिस्थितीतील घटना वाचून भारतीयांमधील माणुसकी आणि सदसद्विवेक बुध्दीची जाणीव आवर्जून दिसुन आली.
व्हाॅट्सप बद्दल काही. ..
व्हाॅट्सप' किंवा तत्सम अॅप्स 'कम्युनिकेशनसाठी' असली तरी प्रॅक्टिकल आयुष्यात जरा वेगळे चित्र आहे.
'व्हाॅट्सप' जेव्हा सुरू झाले तेव्हा एक एक मेसेज अगदी उत्साहाने वाचला जायचा.
आता असंख्य गृप वरचे शेकडोवर असणारे मेसेजेस बरेचदा ओपन करून न वाचताच डिलीट केले जातात. कारण हे गृहीतच धरलेले असते की त्या मेसेजेस मध्ये काही गुड मॉर्निंग, गुड नाईट ..काही 'मार्केटमे एकदम नया' टाईपचा मेसेज, 'हे शोधा ते शोधा' टाईपची कोडी तर कधी प्रसंगानुरूप संकष्टी, गुरुवार वगैरेच्या शुभेच्छा असणार!
'व्हाॅट्सप' वरील गृप म्हणजे तर एक गमतीशीर जग आहे. गृप बनवताना
उत्साहाने सहभागी झालेले सगळे..नंतर मात्र काहीजण आपापसातील मतभेद, राग, इर्षा
गृप वरही आणतात. मग गृप संभाषणात तटस्थ राहणे, काही मोजक्या गृप मेंबर्स बरोबरच बोलणे असे बालिश प्रकार सुरु होतात. गृप मधुन 'एक्झिट' होऊन 'वाईटपणा' ( !! ??) का घ्यावा म्हणून फक्त असे लोक गृपमध्ये राहतात.
सारांश असा की सध्या तरी ही अॅप्स फक्त 'contact' ठेवायलाच उपयोगी आहेत, एकमेकांशी 'संवाद' वाढवायला अजुन तरी अपुरी आहेत.
Subscribe to:
Posts (Atom)