Jan 24, 2016
#नटसम्राट
नाना पाटेकर यांचे अतुलनीय अभिनय सामर्थ्य , मेधा मांजरेकर यांची मितभाषी अवर्णनीय अदाकारी यांनी नटलेला ‘नटसम्राट’
हा चित्रपट मराठी व अमराठी प्रत्येक दर्दी रसिकांनी अगदी डोळे, कान, मन एकवटून
बघावा असा आहे.
अभिनया बरोबरच दाद दिली पाहिजे ती खणखणीत संवाद लेखनाला! शिरवाडकरांची मुळ संहिता कायम ठेवून लेखक किरण यज्ञोपवित यांनी माध्यमानुरूप लिहिलेले संवाद, उपमांनी व अलंकारिक सजलेले, आजच्या काळात नामशेष व कालातीत होण्याच्या मार्गावर असलेले अस्सल मराठी शब्द ऐकून कान तृप्त नाही झाले तरच नवल!
हा चित्रपट पाहिल्यावर त्यातील त्रुटी व कमतरतेवर चर्चा करणे म्हणजे श्रीसत्यनारायण पूजेच्या प्रसादातील चुका काढण्याचा प्रयत्न आहे.
‘कुणी घर देतं का घर?’ To Be or Not To Be, ‘जगावं की मरावं’,
असे काळजाला भिडणारे संवाद व आपसूकच होणारा टाळ्यांचा कडकडाट व या सर्वांस
थिएटर मधून बाहेर पडताना
आजच्या तरुण पिढीनेही
साश्रुनयनांनी दिलेली दाद प्रत्येकाने अनुभवायलाच हवी.
Jan 19, 2016
तक्रार निवारण केंद्र
नव्या विद्यापीठ कायद्याच्या प्रस्तावात प्रत्येक काॅलेज मध्ये विद्यार्थी तक्रार निवारण केंद्र सुरू करण्याची सुचना केली आहे. हा उपक्रम
विद्यार्थ्यांना नक्कीच उपयुक्त ठरेल.
परीक्षांचे निकाल लांबणे, निकालातील चुका, सुविधांचा अभाव, शिष्यवृत्तीचा परतावा न मिळणे यासारख्या
शैक्षणिक अडीअडचणी, प्रसाधन गृहातील अस्वच्छता, आरोग्यसेवेच्या
प्रथमोपचारात कमतरता यासारख्या दैनंदिन समस्या, रॅगिंग सारख्या गंभीर सामाजिक समस्या, शिक्षक-विद्यार्थी असमन्वय तसेच विद्यार्थ्यांच्या शिक्षणेतर गरजा शालेय व्यवस्थापनापर्यंत पोहोचवून त्यातून मार्ग काढणे व महाविद्यालयातील समस्या दूर करण्यासाठी या तक्रार निवारण मंचाचा उपयोग होईल.
Jan 8, 2016
नांदा सौख्यभरे' ?
झी वाहिनीवर सुरू असलेल्या सुचित्रा बांदेकर प्रस्तुत 'नांदा सौख्यभरे' या मालिकेकडून खूप अपेक्षा होत्या. परंतु प्रत्यक्षात सकस कथेचा अभाव असलेली ही रटाळ मालिका दिवसेंदिवस भरकटत आहे. अमेरिकेत शिक्षण घेऊन आलेल्या इंद्रनीलची हुशारी अजून तरी मालिकेत दिसून आलेली नाही.
नात्यातील खरेपणाचे महत्त्व जपणारी स्वानंदी स्वतः मात्र संपदाला व्हिसा प्रकरण विनाकारण लपवायला सांगते. हट्टी संपदा तर प्रत्येक सीन मध्ये फक्त उच्छाद मांडताना दिसते. उत्कृष्ट विनोदी अभिनय करणारी सुहास परांजपे ही अभिनेत्री 'ललिता' हे खलनायकी पात्र साकारताना अजुनही चाचपडत आहे. बाकी इतर पुरूष कलाकार तर मालिकेत असून नसल्या सारखेच आहेत.
कृपया निर्माता-दिग्दर्शकांनी मालिका
ट्रॅक वर आणून वेळीच संपवावी.
मुलगीच दत्तक हवी
मुलगा वंशाचा दिवा’ या म्हणीप्रमाणे पूर्वी मुलगा दत्तक घेणाऱ्यांचे प्रमाण अधिक होते, परंतु सध्या हा समज मागे पडत चालला असून निपुत्रिक दाम्पत्यांचा कल मुलगी दत्तक घेण्याकडे वाढत असल्याचे दिसून येते.
केंद्रीय दत्तविधान संस्थेकडून ( कारा ) आलेल्या अहवालानुसार देशात मुलांच्या तुलनेत ३६ टक्के मुलींना दत्तक घेण्याचे प्रमाण वाढले असल्याची माहिती समोर आली. त्यात मुलींना दत्तक घेण्याबाबत महाराष्ट्र राज्य अव्वल क्रमांकावर आहे ही खरोखरच समाधानकारक व कौतुकास्पद वास्तव आहे.
मुलगीच दत्तक हवी', असे सांगत महिनोन्महिने वेटिंग लिस्टवर थांबण्याची सामाजिक सुशिक्षित
मानसिकता म्हणजे भावी सुसंस्कृत समाजाचे
आशादायी चित्र म्हणायला हरकत नाही.
Jan 1, 2016
पाडगावकरांना श्रध्दांजली
अजरामर कविता आणि गीतांचे शिल्पकार कवीवर्य श्री मंगेश पाडगावकर यांचे अकल्पित निधन मनाला चटका लावणारे आहे. 'सांग सांग भोलानाथ' पासून ते 'प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम' पर्यंत त्यांच्या सर्व कविता, गाणी समस्त मराठी माणसांच्या मनात कायम रूंजी घालत राहतील. वयाच्या प्रत्येक टप्प्यावरील मानवी भाव भावनांचे मोती शब्दांच्या कोंदणात अलगद गुंफण्याची दैवी किमया अवगत असलेला हा कवी पुन्हा होणे नाही.
त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हिच ईश्वर चरणी प्रार्थना!
Subscribe to:
Posts (Atom)